कुटुंबप्रमुख म्हणून बारामती पोटनिवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार - शरद पवार
नवी दिल्ली, 06 एप्रिल (हिं.स.)। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली असून, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्पष्टीकरण द
SP NCP Withdraws Baramati Bypoll  Sharad Pawar Taken Head Family


नवी दिल्ली, 06 एप्रिल (हिं.स.)। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली असून, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले की, कुटुंबप्रमुख म्हणून ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, कोणतीही निवडणूक लढवताना समोर प्रतिस्पर्धी असणारच हे गृहीत धरावे लागते, मात्र सध्याच्या परिस्थितीत पवार कुटुंबावर दुःखाचे सावट असल्यामुळे त्यांनी बारामतीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, त्यातून सावरण्यासाठी वेळ आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी राष्ट्रवादीशी संबंधित नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र शरद पवार यांच्या गटाकडून कोणताही उमेदवार देण्यात आलेला नाही. याच वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने बारामतीत आपला आघाडीचा उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

काँग्रेसच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी सांगितले की, कोणत्याही मतदारसंघात उमेदवार देणे हा त्या पक्षाचा अधिकार आहे. परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेसने हा निर्णय घेतला असावा, असे त्यांनी नमूद केले. महाविकास आघाडी एकत्र असली तरी अशा प्रकारच्या स्थानिक अडचणी येत असतात आणि त्या फार मोठा राष्ट्रीय मुद्दा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, राजकारणात अशा प्रकारची वक्तव्ये करण्यासाठी परिपक्वता आवश्यक असते आणि पार्थ पवार यांच्याकडे ती परिपक्वता आहे की नाही, याबाबत आपल्याला माहिती नाही.

तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, यापूर्वी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती, मात्र अजित पवार यांचा दृष्टिकोन वेगळा होता. आता त्यांच्या निधनानंतर पक्षात विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande