राहुरी पोटनिवडणूक - प्राजक्त तनपुरेंची माघार, गोविंद मोकाटेंना संधी
- राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम विश्वास - तनपुरे अहिल्यानगर, 06 एप्रिल (हिं.स.) - राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस (शप) कडून प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर गोविं
प्राजक्त तनपुरे


- राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम विश्वास - तनपुरे

अहिल्यानगर, 06 एप्रिल (हिं.स.) - राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस (शप) कडून प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर गोविंदराव मोकाटे यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे आता भाजपकडून अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (शप) कडून गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होणार हे आता निश्चित झाले आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राहुरी तालुक्याचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचा ध्यास मनात ठेवून मी या विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहत होतो. याच जाणिवेतून राहुरीच्या विकासासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, युवकांच्या स्वप्नांसाठी, आणि महिलांच्या सन्मानासाठी मी ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. परंतु, आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी माझी भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही पोटनिवडणूक न लढविण्याची विनंती केली, असे तनपुरे म्हणाले.

भाजप नेत्यांच्या चर्चेदरम्यान मी त्यांच्यासमोर राहुरीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या. मला समाधान आहे की, त्या सर्व मुद्द्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या मान्य केल्या. जरी आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला, तरी राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम विश्वास आणि आश्वासन त्यांनी दिल्याचे ते तनपुरे यांनी सांगितले.

त्यांच्या या विनंतीचा मान राखत आणि स्व. शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली अर्पण करत मीही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नाही. पण हा निर्णय म्हणजे आपली लढाई थांबली जसा अजिबात अर्थ नाही. आपण दोन पावले मागे घेतली आहेत. पण आता त्यानंतर चार पावले पुढे जाण्याची तयारी आहे. राहुरीच्या विकासाची, आपल्या हकाची ही लढाई अधिक ताकदीने, अधिक निर्धाराने अशीच सुरू राहील, असा विश्वासही तनपुरेंनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande