
चंद्रपूर, 07 एप्रिल, (हिं.स.)। पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास अभियान अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झाली असून उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या योजनेच्या नोंदणीसाठी pmintemship.mca.gov.in या वेब पोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करावी. देशातील प्रमुख 500 कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार आहे.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत पाच वर्षात एक कोटी तरूणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक उमेदवारांना प्रति महिना 9 हजार रूपये देण्यात येणार असून इंटर्नशिपचा कालावधी 6 किंवा 9 महिने आहे. भारत सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत या प्रशिक्षणार्थी साठी विमा कवच देखील दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 21 ते 25 वर्ष आहे, असे पुर्णवेळ शिक्षण किंवा रोजगार नसलेल्या बेरोजगार तरुणासाठी ही संधी आहे.
चंद्रपूर जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव