
परभणी, 07 एप्रिल (हिं.स.)। परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत, महापालिकेच्या महत्त्वाच्या सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी आणि आरोग्य विभागाशी संबंधित सेवा लवकरच घरबसल्या उपलब्ध होणार आहेत.
या ऑनलाईन सेवांचा शुभारंभ महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजुलाला, गटनेते दिलीप ठाकूर, आरोग्य अधिकारी तथा निबंधक कल्पना सावंत यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागासाठी संगणक, स्कॅनर आणि प्रिंटरचे वितरणही करण्यात आले.
महानगरपालिकेत विविध दाखल्यांसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व सेवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्य सुविधा पुढीलप्रमाणे :
जन्म-मृत्यू नोंदणी : नव्या जन्म किंवा मृत्यूची नोंदणी तसेच प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा
विवाह नोंदणी : ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे अपलोड व अपॉइंटमेंटची सुविधा
आरोग्य सेवा : परवाने, तक्रारी आणि आरोग्यविषयक माहिती ऑनलाईन
उपलब्ध
या प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचणार असून, अर्जाची स्थिती मोबाईलवर पाहता येणार आहे. तसेच डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्रे डाउनलोड करता येणार असल्याने कार्यालयात जाण्याची गरज कमी होणार आहे.
ही सेवा लवकरच अधिकृतपणे सुरू होणार असून, त्यासाठी स्वतंत्र पोर्टल किंवा मोबाईल ॲपची लिंक महापालिकेतर्फे जाहीर केली जाणार आहे. नागरिकांनी ‘Nagrkatywali’ पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आयुक्त नितीन नार्वेकर यांनी सांगितले की, “परभणी शहराला स्मार्ट बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक व जलद सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis