
परभणी, 07 एप्रिल, (हिं.स.)। पक्षाच्या बैठका, पत्रकार परिषद आणि प्रशिक्षण कार्यशाळांना सातत्याने गैरहजर राहून संघटनात्मक शिस्त धोक्यात आणल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी नऊ नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना पाठविले आहे.
जिल्हाध्यक्ष भरोसे यांनी सोमवारी सायंकाळी संबंधित पत्राची प्रत प्रसारमाध्यमांना पाठवून माहिती दिली. पत्रानुसार, 6 एप्रिल रोजी स्थापना दिन, 1 एप्रिल रोजी एसआयआर बैठकीस, 23 मार्च रोजी अर्थसंकल्पीय पत्रकार परिषद व जिल्हास्तरीय बैठक, तसेच 8 मार्च, 5 मार्च, 27 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या विविध बैठका व कार्यशाळांमध्ये अनेक नगरसेवक सातत्याने गैरहजर राहिले. डॉ. केदार खटींग, रितेश झांबड, मीना सुरेश वरपुडकर, गिरीजा शंकर आजेगांवकर, गणेश नंदकुमार टाक आणि विश्वजित बुधवंत हे नगरसेवक वारंवार अनुपस्थित राहिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या गैरहजेरीमुळे पक्षाच्या कार्यात अडथळे निर्माण होत असून संघटनात्मक एकता व शिस्त ढासळण्याची शक्यता असल्याचे भरोसे यांनी म्हटले आहे.याशिवाय, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्यावरही पक्षविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी पक्षाच्या अधिकृत बैठकींना उपस्थिती लावलेली नसल्याने ही बाब गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणी संबंधित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष भरोसे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis