
परभणी, 07 एप्रिल (हिं.स.) । नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी महिला गटांना अर्ज करण्याची अंतिम तारीख आता २५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्याच्या प्रकल्प गावातील नोंदणीकृत महिला शेतकरी गट, एमएसआरएलएन (उमेद) पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघ गावस्तरावरील कृषि औजारे बँक स्थापन करून यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देऊ शकतील. एक गाव – एक कृषी औजारे बँक या तत्त्वानुसार प्रत्येक तालुक्यात ठराविक संख्या निश्चित करण्यात आली आहे.
जर एका गावातून एकापेक्षा जास्त गटांनी अर्ज केला, तर ऑनलाइन लॉटरी पद्धतीने अर्जाची निवड केली जाईल. अर्ज प्रक्रियेची सुरुवात १४ नोव्हेंबर २०२५ पासून झाली होती आणि मूळ शेवटची तारीख ५ एप्रिल २०२६ होती. मुदतवाढ झाल्यामुळे महिला गट आता २५ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी FPO-DBT पोर्टल (https://dbt-ndksp-agribusiness.mahapocra.gov.in/
) वापरता येईल.
प्रकल्प संचालक (आत्मा) दौलत सुदाम चव्हाण यांनी सांगितले की, ही योजना महिला शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त व्यवसाय, यंत्रसामग्री व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्रात पुढे येण्याची संधी देईल. तसेच गावातील शेतकऱ्यांना वेळेवर यंत्रसामग्री उपलब्ध होईल आणि महिला गटांसाठी उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होईल.
अधिक माहितीसाठी तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis