जनगणनेसाठी ‘HLO मोबाईल ऍप्लिकेशन’वापरा -जितेंद्र डुडी
पुणे, 07 एप्रिल (हिं.स.)। भारतीय जनगणना -२०२७ च्या अनुषंगाने माहितीचे संकलन अधिक जलद, अचूक व पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत प्रगणकांद्वारे ‘HLO मोबाईल ऍप्लिकेशन’विकसित करण्यात आले आहे. य
collector dudi


पुणे, 07 एप्रिल (हिं.स.)। भारतीय जनगणना -२०२७ च्या अनुषंगाने माहितीचे संकलन अधिक जलद, अचूक व पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत प्रगणकांद्वारे ‘HLO मोबाईल ऍप्लिकेशन’विकसित करण्यात आले आहे. यामुळे कागदी काम गतीने होण्यासोबतच वेळ व श्रमाची बचत होणार आहे, जनगणनेच्या कामाकरिता प्रगणकांनी या ऍप्लिकेशनचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

मोबाईल ऍप केवळ गुगल प्ले स्टोअर तसेच ऍपल ऍप स्टोअर वरूनच डाउनलोड करावे. गुगल प्ले स्टोअर किंवा ऍपल ऍप स्टोअरवरून ऍपचे अपडेट वेळोवेळी तपासावेत आणि ऍप अद्ययावत असल्याची खात्री करुन घ्यावी. मोबाईल ऍपमध्ये लॉगिन व त्याचा वापर केवळ एकाच नोंदणीकृत मोबाइल उपकरणावर करावे. उपकरणाची नोंदणी फक्त एकाच युजर आयडी लॉगिनसाठी करावी. आपले मोबाईल उपकरण, प्राधिकृत (चार्ज) अधिकारी यांनी जनगणना व्यवस्थापन व देखरेख प्रणाली (सीएमएमएस) वर घरयादी गटाच्या (एचएलबी) वाटपानंतरच नोंदणीकृत करावा. लॉगिनसाठी आवश्यक क्रेडेन्शियल्सचा तपशील चार्ज अधिकारी एसएमएस, ई-मेलद्वारे पुरविण्यात येणार आहे.

सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मोबाइल ऍपचा डीफॉल्ट पासवर्ड बदलावा. मोबाइल ऍप स्क्रीनवर दर्शविलेले स्थानासंबंधी तपशील नियुक्तीपत्रातील दर्शविलेल्या तपशिलानुसार असल्याची खात्री करावी आणि खात्री केल्यानंतरच आपणास दिलेल्या घरयादी गटाच्या क्षेत्रीय कार्याला सूरुवात करावी. कोणत्याही अडचणीच्या बाबतीत, स्थानाच्या तपशीलामध्ये कोणतीही विसंगती आढळल्यास, उपकरण नोंदणीस अडथळा निर्माण झाल्यास त्वरित चार्ज अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

प्रत्येक ५-६ घर, कुटुंबाची माहिती प्रविष्ट केल्यानंतर, ही माहिती केंद्रीय सर्व्हरवर अपलोड/सिंक करावी जेणेकरून माहिती गमावण्याची शक्यता टाळता येईल. 'सिंक' बटणावर क्लिक केल्यानंतर घरयादी गट पूर्ण झाल्याची पुष्टी करण्यासाठी चेक बॉक्सवर (✔) टिक करणे लक्षात ठेवावे. त्यानंतर रिक्त भागात तुमची स्वाक्षरी करून शेवटी 'जतन करा' या बटनावर क्लिक करावे. क्षेत्रीय कार्यादरम्यान आपले मोबाइल उपकरण सुरक्षित ठेवावे, तसेच कोणत्याही अनधिकृत व्यक्ती व लहान मुलांपासून दूर ठेवावा.

भारतीय जनगणना -२०२७ च्या कामाकरिता आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांना आपल्याशी निगडित वस्तुनिष्ठ माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande