
नाशिक, 07 एप्रिल (हिं.स.) : भोंदू खरात महिलांना कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची आणि बदनामीची भीती दाखवत त्यांचे लैंगिक शोषण करत होता, अशी माहिती एसआयटी पथकाने दिली आहे. याशिवाय, विविध पूजाविधी, खडे, चिंचोके आणि रुद्राक्ष यांच्या नावाखालीही त्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली होती.
एसआयटी पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, विशेष तपास पथकाने सखोल तपास सुरू केला असून दररोज नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत.
राज्य सरकारने एसआयटीची नियुक्ती केल्यानंतर १७ दिवसांनी पत्रकार परिषदेत तपासाबाबत माहिती दिली. आतापर्यंत आशोक खरातविरोधात एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी नऊ गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे, दोन गुन्ह्यांचा अहिल्यानगर पोलिसांकडे, तर एक गुन्हा नाशिक पोलिसांकडे आहे. एसआयटीकडे असलेल्या आठ प्रकरणे लैंगिक शोषणाशी संबंधित असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले.
तपास २४ पथकांमार्फत चालू असून सायबर टीमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चार सदस्यांच्या या टीमने आतापर्यंत ४,६५० आक्षेपार्ह लिंक हटवल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणारी ४५१ खाती कायमची बंद करण्यात आली आहेत. पीडितांचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरुद्धही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या प्रकरणात ३० महिलांचे जबाब नोंदविण्यात आले असून अनेक पीडित महिला पुढे येत असल्याचे सातपुते यांनी सांगितले. तसेच, खरातच्या मालमत्तेचा तपास एसआयटी आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या संयुक्त पद्धतीने केला जाणार आहे. येत्या ४० ते ४५ दिवसांत आठ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV