
ठाणे, 08 एप्रिल, (हिं.स.)। गेल्या २२ वर्षांपासून ठाणे शहरातील घर व व्यावसायिक मालमत्तांच्या खरेदीसाठी नागरिकांना आकर्षक पर्याय व सवलती उपलब्ध करणाऱ्या `क्रेडाई- एमसीएचआय, ठाणे' यांच्या वतीने `एमसीएचआय है तो भरोसा है' अशी टॅगलाईन घेऊन यंदा १७ एप्रिल ते १९ एप्रिलपर्यंत भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ठाणे पश्चिम येथील बाळकूम येथील `दोस्ती वेस्ट काउंटी'मध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रदर्शनामध्ये ग्राहकांना शेकडो गृह व वाणिज्य प्रकल्पातून पसंतीच्या मालमत्तेची निवड करता येईल. या प्रदर्शनात कर्जपुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध बँक आणि खासगी वित्तीय संस्थांची दालने असतील.
`क्रेडाई- एमसीएचआय, ठाणे' संस्थेचे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी `क्रेडाई- एमसीएचआय, ठाणे'चे गत अध्यक्ष जितेंद्र मेहता, `क्रेडाई- एमसीएचआय, ठाणे'चे निर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैय्याज विराणी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिदार जय व्होरा, `क्रेडाई- एमसीएचआय, ठाणे'च्या युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता आदींसह पदाधिकारी व प्रमुख सदस्य उपस्थित होते.
`क्रेडाई- एमसीएचआय, ठाणे' संस्थेने ठाणे शहराचा विकास व नागरिकांची गरज लक्षात घेऊन २२ वर्षांत प्रदर्शनातून अनेक मालमत्ता प्रकल्प सादर केले आहेत. त्यातून हजारो कुटुंबांचे स्वप्नातील घर साकारले. हजारो व्यावसायिकांना वाणिज्य मालमत्ता खरेदी करता आल्या. त्यामुळे `एमसीएचआय है तो भरोसा है' असा विश्वास ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे. ठाणेकरांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो, याबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी यांनी आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, ``ठाणे शहरातील रिअल इस्टेट व्यवसायाचा वेगाने विस्तार होत असून, नवे व आधुनिक जीवनशैली असलेले गृहप्रकल्प साकारले जात आहेत. विशेषत: अनेक व्यापारी मालमत्ता आहेत. १७ एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी नवीन युगातील घरे व वाणिज्य मालमत्तांची माहिती नागरिकांना मिळेल. रिअल इस्टेटमधील नवे पर्याय व सरकारी धोरणे आणि गृहसजावट व अंतर्गत रचनेबाबतही प्रदर्शनात माहिती मिळेल. शहराचा विकास होत असल्यामुळे मालमत्तेत गुंतवणुकीची गुंतवणूकदारांना उत्तम संधी आहे. आतापर्यंत गुंतवणूकदारांना चांगला परतावाही मिळाला आहे. त्यामुळे ग्राहकांबरोबरच गुंतवणूकदारांनीही प्रॉपर्टी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी.''
देशातील आघाडीच्या `रिअल इस्टेट डेव्हलपर्स'कडून ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबरोबरच नागरिकांना एकाच ठिकाणी गृह कर्जासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी आणि खासगी वित्तीय संस्थांबरोबर संपर्क साधता येईल. या प्रदर्शनात कौटुंबिक आणि विविध विषयांवर माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच `महारेरा' कायद्यातील तरतूदींबाबत कार्यक्रमातून माहिती दिली जाईल, असे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले. आधुनिक जीवनशैलीला पसंती देणाऱ्या नागरिकांना ठाण्यातील अनेक प्रतिष्ठीत गृहसंकुलातील घरांचा पर्यायही उपलब्ध असेल. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे समाधान होईल, असा विश्वास अध्यक्ष सचिन मिराणी यांनी व्यक्त केला.
भविष्यासाठी ठाण्यात घर : जितेंद्र मेहता
एका छोट्या शहरातून मोठ्या विकसित व प्रगतीशील शहरापर्यंत ठाण्याचा प्रवास झाला. भविष्यात ठाणे हे मुंबई महानगर क्षेत्रातील महत्त्वाचे शहर होईल. शहरातील उत्तम पायाभूत सुविधा, मुंबई व महाराष्ट्राच्या इतर भागात पोचण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रोसह विविध पर्याय आणि दर्जेदार जीवनशैली लक्षात घेऊन भविष्यासाठी ठाणे शहरामध्ये नागरिकांनी आवर्जून घर घ्यावे, असे आवाहन गत अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केले.
२३ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच आठवड्यात तुम्हाला घर व गुंतवणुकीसाठी मालमत्ता पाहून खरेदी करण्याची संधी मिळेल, अशी माहिती सचिव फय्याज विराणी यांनी दिली. मुंबई महानगर क्षेत्रात ठाणे हे नागरिकांच्या सर्वात पसंतीचे शहर आहे. या शहरात घर घेण्यासाठी प्रॉपर्टी प्रदर्शन ही उत्तम संधी आहे, असे प्रदर्शनाचे चेअरमन विभव बोरकर यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून आलिशान घरांसाठी ठाणे हा एक चांगला पर्याय राहिला, असे मत खजिनदार जय व्होरा यांनी व्यक्त केले. या प्रदर्शनात घर नोंदणी करून ठाणे शहरात स्वत:च्या मालकीचे घर व उत्तम जीवनाचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध आहे, असे मत युवा शाखा अध्यक्ष निमित मेहता यांनी व्यक्त केले. घर खरेदी करण्यासाठी उत्सूक कुटुंबाचे समाधान करण्याचा प्रयत्न प्रॉपर्टी प्रदर्शनात करण्यात आला आहे, अशी माहिती निर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा यांनी दिली.
ठाण्याची अर्थव्यवस्था १५० अब्ज डॉलर्सपर्यंत
ठाणे शहराच्या विकासात `क्रेडाई- एमसीएचआय, ठाणे' संस्थेबरोबरच संस्थेच्या सभासदांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे नमूद करीत अध्यक्ष सचिन मिराणी यांनी ठाणे शहराला गुंतवणूकदारांबरोबरच नागरिकांसाठी आकर्षक करण्यासाठी `ठाणे व्हिजन २०३०'ची घोषणा केली. त्यानुसार ठाणे शहरामध्ये पर्यावरणाचे भान राखून स्मार्ट पायाभूत सुविधा, शाश्वत विकास, डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीबरोबरच सामुदायिक विकास, शहराचा सांस्कृतिक चेहरा जपण्याबरोबरच शांत व प्रसन्न शहर म्हणून शहराचा नावलौकिक निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. रियल इस्टेटच्या माध्यमातून येत्या २०३० पर्यंत शहराची अर्थव्यवस्था १५० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे सचिन मिराणी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर