चिपळूणमध्ये जनगणना फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ
रत्नागिरी, 8 एप्रिल, (हिं. स.) : देशातील सोळाव्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या आठव्या जनगणनेच्या पूर्वतयारीला वेग आला असून, त्याअंतर्गत चिपळूण पंचायत समितीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात फील्ड ट्रेनर्ससाठी आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास प्
चिपळूणमध्ये जनगणना फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ


रत्नागिरी, 8 एप्रिल, (हिं. स.) : देशातील सोळाव्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या आठव्या जनगणनेच्या पूर्वतयारीला वेग आला असून, त्याअंतर्गत चिपळूण पंचायत समितीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात फील्ड ट्रेनर्ससाठी आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे आणि राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे मास्टर ट्रेनर म्हणून उपस्थित होते. जनगणना समन्वय अधिकारी संजीव गावकर, सहाय्यक महसूल अधिकारी संभाजी ढेंबरे आणि तांत्रिक सहाय्यक अमोल करंडे यांनी मार्गदर्शन केले.

यंदाच्या जनगणनेचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान फील्ड ट्रेनर्सना मोबाइल ॲपचा वापर, माहिती नोंदणी प्रक्रिया, नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या ३३ प्रश्नांची अचूक हाताळणी, तसेच CMMS पोर्टलद्वारे माहिती संकलन आणि नियंत्रण याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले जात आहे.

‘जनगणना २०२७’ ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा ‘घरयादी व घरगणना’ तर दुसरा टप्पा ‘लोकसंख्या गणना’ असा असेल. यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना ‘स्वगणनेची’ (Self-Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत.

या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या तयार करण्यात येत असलेले फील्ड ट्रेनर्स पुढे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे आगामी जनगणना अधिक अचूक, जलद आणि प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

यंदाच्या जनगणनेत प्रथमच जातनिहाय माहिती संकलित केली जाणार असून, डिजिटल माध्यमामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह, वेगवान आणि पारदर्शक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande