खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी
नाशिक, 09 एप्रिल (हिं.स.)। - अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. यामध्ये आता अजून काय नवीन माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिलांचे शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदू
खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी


नाशिक, 09 एप्रिल (हिं.स.)।

- अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. यामध्ये आता अजून काय नवीन माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महिलांचे शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मागील सुनावणी प्रमाणेच सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला व्हिडीओ कॉनफरन्सद्वारे नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ केल्याने आता त्याचा पोलीस कोठडीतील खरातचा मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने त्याला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

न्यायाधीश श्रीमती बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आजची सुनावणी पार पडली. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तपास अधिकारी अमोल भारती यांनी गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट करत फिर्याद वाचून दाखवली. सरकारी वकिलांनीही तपासासाठी कोठडीची गरज अधोरेखित केली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉपमधील माहिती तपासण्यासाठी त्याला समोर बसवून चौकशी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोपही करण्यात आला.

दुसरीकडे, आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध करत, याआधीच एसआयटीकडून सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले. आधीच्या गुन्ह्यांमध्येही असेच मुद्दे मांडले गेले असून, पुन्हा कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच गुन्ह्याचा कालावधी, पुरावे आणि तपासाच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी प्रत्युत्तर देताना प्रत्येक गुन्हा स्वतंत्र असून, त्यासाठी वेगळी चौकशी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयानेही तपास अधिकाऱ्यांना घटनेच्या कालावधीबाबत विचारणा केली असता, 2023 पासून विविध महिलांबाबत अशा घटना घडत असल्याची माहिती देण्यात आली. शेवटी न्यायालयाने आरोपी अशोक खरातला विचारले असता, त्याने काहीही सांगण्यास नकार देत हात जोडले. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande