जळगावात एटीएम कार्ड बदलून १.२० लाखांची लूट
जळगाव , 09 एप्रिल (हिं.स.) एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली एका भामट्याने वृद्धाचे एटीएम कार्ड अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख २० हजार ८१ रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.भडगाव तालुक्यातील वडगाव बु
जळगावात एटीएम कार्ड बदलून १.२० लाखांची लूट


जळगाव , 09 एप्रिल (हिं.स.) एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली एका भामट्याने वृद्धाचे एटीएम कार्ड अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख २० हजार ८१ रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.भडगाव तालुक्यातील वडगाव बु॥ येथील रहिवासी असलेले रतन वना पाटील (वय ८७) हे व्यवसायाने शेतकरी आहेत. ते काही कामासाठी भडगाव शहरात आले होते. शहरातील बडेसर कॉम्प्लेक्समधील एका एटीएम केंद्रावर ते पैसे काढण्यासाठी गेले असता, तिथे उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना गाठले. “मी तुम्हाला पैसे काढून देण्यास मदत करतो,” असे म्हणून त्या भामट्याने पाटील यांचा विश्वास संपादन केला. पैसे काढण्याच्या गडबडीत असताना त्या भामट्याने फिर्यादी पाटील यांचे एटीएम कार्ड शिताफीने बदलले आणि त्यांच्या हातात दुसरेच बनावट कार्ड सोपवले. पाटील यांना या प्रकाराची पुसटशीही कल्पना आली नाही. मात्र, ते तिथून निघाल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख २० हजार ८१ रुपये काढून घेण्यात आले. मोबाइलवर आलेले मेसेज पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रतन पाटील यांनी तातडीने भडगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande