
रत्नागिरी, 9 एप्रिल, (हिं. स.) : एका दरोड्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात देवरूख पोलिसांना यश आले आहे.
काल, दि. ८ एप्रिल रोजी प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहूवाडी, कोल्हापूर) आपल्या बोलेरो गाडीमधून वेतोशी, ता. रत्नागिरी येथून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास १ म्हैस भरून रत्नागिरीहून शिराळा (सांगली) येथे निघाले होते. त्यांची गाडी आंबा घाटातील दख्खन येथे पोहोचली, तेव्हा मागील काचेवर पांडुरंग लिहिलेली थार गाडी (क्र. एमएच ०८-२७६७) आणि भारत सरकार असा स्टिकर असलेली इनोव्हा गाडी (क्र. एमएच ०८ - २०९९) यामधून आलेल्या ८ अनोळखी इसमांनी श्री. दळवी यांच्या गाडीच्या पुढे आणि मागे लावून फिर्यादीला गाडीतून खाली उतरवून मारहाण आणि शिविगाळ केली. तसेच चाकूचा धाक दाखवून त्याला इनोव्हा गाडीमध्ये जबरदस्तीने कोंबून साखरपा येथील गद्रे पेट्रोल पंपावर आणून श्री. दळवी यांना याला दमदाटी केली. पोलिसांना काही सांगिलेस तर याद राख, अशी धमकी दिली आणि त्यांच्याकडे ५० हजाराची मागणी केली. त्यांच्या गाडीचे केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत पोलिसात तक्रार केली तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.
या तक्रारीवरून देवरूख पोलीस ठाण्यात आज सकाळी ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली लांज्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तातडीने तपास पथके तयार केली आणि तपास सुरू केला. गुन्ह्यातील फरहान रशिद मुल्ला (वय-४२, रा. कोकण नगर ता. जि. रत्नागिरी), प्रथमेश सचिन भाटकर (वय-२४ रा. गोळप ता. रत्नागिरी), सर्वेश सुभाष कीर (वय-२२ रा. कीरबाग, सोमेश्वर, रत्नागिरी), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (वय-२६ वर्षे कुवारबाव, रत्नागिरी) भूषण बिपेंद्र सावंत (वय-२६ वर्षे, मिऱ्या, भारती शिपयार्डजवळ, रत्नागिरी) अशा ५ आरोपींना तत्काळ अटक केली. उर्वरीत फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी