
अकोला, 09 एप्रिल (हिं.स.) : अकोला शहरात 7 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या जबरी चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी यशस्वी छडा लावत मुख्य आरोपी अभिजित रामेश्वर हिंगणे (वय 29, रा. गायत्रीनगर, अकोला) याला अटक केली आहे. आरोपीकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण ₹1,47,000 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माहितीनुसार, रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी मोटारसायकलने घरी जात असताना तुकाराम चौक परिसरात दोन आरोपींनी त्याला अडवले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला मलकापूर रोडजवळील एका निर्जन जागेत नेऊन लोखंडी चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आणि फिर्यादीच्या खिशातून विवो मोबाईल (किंमत ₹25,000), रोख ₹5,000 तसेच फोन-पे द्वारे ₹180 घेऊन ₹30,180 ची लूट केली.
गुप्त माहितीनुसार पोलिसांनी अभिजित हिंगणे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार अमित गवळी (रा. मलकापूर, अकोला) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून ₹2,000 रोख, चोरीतील मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली काळी रंगाची रॉयल एनफिल्ड मोटारसायकल (अंदाजे ₹1,20,000) जप्त केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरु आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे