
- मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर सपकाळांकडून घोषणा
मुंबई, 09 एप्रिल (हिं.स.) : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आज, गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने ही घोषणा केली असून, यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेत्यांकडून वारंवार होणारी विनवणीवर निर्णय न घेणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. त्यानंतर काँग्रेसकडून हा निर्णय घेण्यात आला.
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रातील परस्पर सामंजस्याच्या परंपरेनुसार एखाद्या व्यक्तिच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील कुणी पोटनिवडणूक लढवत असल्यास इतर पक्ष आपले उमेदवार उभे करीत नाहीत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक देखील बिनविरोध व्हावी ही बहुतेक सर्वच राजकीय पक्षांची इच्छा होती. परंतु, काँग्रेसने बारामतीतून उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसने या निवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती.ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीमधील अनेक दिग्गज नेते प्रयत्नरत होते. विशेष म्हणजे पवार कुटुंबियांकडून देखील त्यासंदर्भात प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी देखील बिनविरोध निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न चालवले होते. परंतु, दिल्लीतील काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदिल न मिळाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यासंदर्भात काहीच निर्णय घेऊ शकत नव्हते. त्यामुळे बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होईल का ? याविषयी संशयकल्लोळच होता.
यापार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केला. फडणवीसांच्या फोन नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तत्काळ दिल्लीला फोन करून राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना काँग्रेस हायकमांड पर्यंत पोहचवल्या. त्यानंतर सपकाळ यांनी लगेच पत्रकार परिषद घेत बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस आपली उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले.
एकीकडे हर्षवर्धन सपकाळ बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करीत असतानाच दुसऱीकडे बीडच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सूचक प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, “सपकाळांनी चांगला निर्णय घेतला आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी त्यांना सकाळीच फोन केला होता. प्रदेशाध्यक्ष काही तरी सकारात्मक निर्णयच घेतील याबाबत मला सकाळीच खात्री वाटत होती.” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी