महाराष्ट्राची सभ्यता, सुसंस्कृतपणा विचारात घेऊन पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार : हर्षवर्धन सपकाळ
* उमेदवारी माघारी घेतली असली तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम, २०२९ ला बारामतीत काँग्रेसचा आमदार मुंबई, 09 एप्रिल (हिं.स.) - बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे, कुठेही थांबता का


हर्षवर्धन सपकाळ

 
 
* उमेदवारी माघारी घेतली असली तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम, २०२९ ला बारामतीत काँग्रेसचा आमदार

मुंबई, 09 एप्रिल (हिं.स.) - बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे, कुठेही थांबता कामा नये ही भूमिका आहे. पण याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, समंजस्यपणा, सभ्यता याची एक किनारही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली होती, त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून बारामतीतून काँग्रेसची उमेदवारी माघारी घेत आहोत, आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, दिवंगत अजित पवार यांचे काँग्रेस पक्षाशी अनेक वर्ष संबंध होते, हे संबंध लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. तसेच त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद आबा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे, संजय खोडके, सना मलिक, राजेश विटेकर यांच्या शिष्टमंडळाने आज गांधी भवनला येऊन भेट घेत उमेदवार मागे घेण्याची विनंती केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श.प.) आमदार रोहित पवार यांनीही सकाळी भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. खा. सुप्रिया सुळे यांनीही फोन केला होता. शरद पवार साहेबांनी ही भावना व्यक्त केल्या होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याशीही फोन करून संवाद साधला, त्यांच्या विनंतीनंतर काँग्रेस अध्य मल्लिकार्जुन खर्गे पक्षप्रभारी रमेश चेन्नीथला व राज्यातील काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून बारामतीतून उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बारामतीतून काँग्रेस पक्षाने उमेदावारी मागे घेतली असली तरी अजित पवार यांच्या निधनाची चौकशी व्हावी या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे. तसेच भाजपासारख्या विषारी व विखारी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेसाठी केलेली आघाडी न पटणारी व न रुजनारी आहे, त्याला आजही काँग्रेसचा विरोध कायम आहे, असे सपकाळ म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता आणि बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती त्यांनी केली होती, यावेळी त्यांनी महाराष्ट्र संस्कृती हा शब्दही वापरला पण त्यांचा फोन व उमेदवारी माघारी घेणे याचा काहीही संबंध नाही. भाजपाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे व तो कायम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिवंगत अजित पवार यांच्या अपघातावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल तसेच काँग्रेसशासित कर्नाटक सरकारने यासंदर्भात एफआयआर नोंदवून घेतल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आमदार रोहित पवार यांनी आभार मानले. तसेच काँग्रेस पक्षाबद्दल पार्थ पवार यांनी केलेल्या विधानाबद्द्दल दिलगिरी व्यक्त केली. पार्थ पवार यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन केलेले नाही. त्यांचे विधान अत्यंत चुकीचे, अनावश्यक व अपरिपक्व असल्याने त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार अॅड. आकाश मोरे यांच्यासह इतर चार इच्छुक उमेदवार व बारामतीतील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉल वर संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या व त्यानंतर निर्णय जाहीर केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande