
बीजिंग, 09 एप्रिल (हिं.स.)आयुष शेट्टीने बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत, गुरुवारी तैपेईच्या चिन यू जेनवर सरळ गेममध्ये विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ४१ मिनिटांच्या सामन्यात आयुषने तैपेईच्या बॅडमिंटनपटूवर २१-१६, २१-१२ असा सहज विजय नोंदवला.
आयुषने आपल्या मोहिमेची सुरुवात पहिल्या फेरीत चीनच्या ली शी फेंगवर २१-१३, २१-१६ अशा दणदणीत विजयाने केली होती. उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या तिसऱ्या मानांकित जोनाथन क्रिस्टीचा सामना करताना तो हीच लय वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
दरम्यान, पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉयला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू ४६ मिनिटांच्या सामन्यात चीनच्या दुसऱ्या मानांकित वांग झीयीकडून २१-१८, २१-८ अशी पराभूत झाली.
सिंधूने पहिल्या गेममध्ये जोरदार झुंज दिली आणि १८ गुणांची आघाडी घेतली, पण त्यानंतर तिने काही रॅली गमावल्या. यामुळे तिला पहिला गेम १८-२१ ने गमवावा लागला. वांगने दुसऱ्या गेममध्ये आपले संपूर्ण वर्चस्व कायम राखले आणि सिंधूला आघाडी घेऊ दिली नाही. परिणामी, तिने दुसरा गेम २१-८ अशा मोठ्या फरकाने जिंकला.
खांद्याच्या दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या एचएस प्रणॉयला चीनच्या वेंग हॉंग यांगने २१-१२, २१-१९ अशी मात दिली. मिश्र दुहेरीमध्ये, ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांना मलेशियाच्या चौथ्या मानांकित चेन टँग जी आणि तोह ई वेई यांनी २१-१३, २१-१४ असे पराभूत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे