
इस्लामाबाद, 09 एप्रिल (हिं.स.)पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये, पेशावर झल्मीचा कर्णधार बाबर आझमने हैदराबाद किंग्समेनविरुद्ध ३७ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. १४६ धावांचा पाठलाग करताना, बाबर आझमने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. पण त्याच्या या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर झाले नाही.
पेशावर झल्मीने हा सामना ४ गडी राखून जिंकला असला तरी, एका पत्रकाराने बाबर आझमला विचारले की तो विराट कोहलीप्रमाणे सामने का संपवू शकत नाही. बाबरला हा प्रश्न आवडला नाही.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, एका पत्रकाराने बाबर आझमची तुलना विराट कोहलीशी केली आणि विशेषतः त्याच्या सामना संपवण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्रकाराने विचारले, विराट कोहलीसुद्धा तसेच फटके खेळतो आणि सामने संपवतो, पण तुम्ही कमी पडता. लोक तुमची तुलना त्याच्याशी करतात, तर या तुलनेबद्दल तुम्हाला काय वाटते?
पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना बाबर म्हणाला, तुम्ही ते पूर्ण करायला हवं. तुम्ही ज्या पद्धतीने विचारत आहात, त्या पद्धतीने सोडून द्या. मी बरेच सामने पूर्ण केले आहेत. तुम्हाला वाटतं की मी ते पूर्ण केले नाहीत, पण मी खूप काही केलं आहे.
ह पाकिस्तानचा सर्वात मोठा क्रिकेटपटू असूनही, बाबर आझमला विशेषतः टी-20 फॉरमॅटमध्ये टीकेला सामोरे जावे लागले आहे. पण, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याच्या खराब कामगिरीमुळे समीक्षक अनेकदा त्याला लक्ष्य करतात. बाबरने या मोसमात आतापर्यंत पीएसएलमध्ये दोन सामने खेळले असून, १२६ च्या स्ट्राईक रेटने ८२ धावा केल्या आहेत. या काळात त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे