
तेहरान , 09 एप्रिल (हिं.स.)।इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया आणि तेहरान यांच्यातील संबंध पुन्हा जवळ येताना दिसत आहेत. यावरून खाडी प्रदेशात आता गोळीबाराऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
माहितीनुसार, सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान आणि इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्यात दूरध्वनीवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी खाडीतील तणाव कमी करण्यासोबतच प्रादेशिक स्थैर्य प्रस्थापित करण्यावर भर दिला. पश्चिम आशियात तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेली ही पहिलीच चर्चा आहे. ही चर्चा अशा वेळी झाली आहे, जेव्हा लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुज सामुद्रधुनीभोवती घेराबंदी करत जागतिक व्यापारालाच धोका निर्माण केला आहे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात तणावपूर्ण संबंध होते. अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर इराणने सौदी अरेबिया, कतार आणि यूएईसारख्या देशांनाही थेट लक्ष्य केले होते. सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवरही हल्ले झाले होते. मात्र आता इराणला आपल्या शेजारी देशांशी समन्वय साधण्याची गरज असल्याची जाणीव झाल्याचे दिसत आहे.
कूटनीतिक तज्ज्ञांच्या मते, शांतता चर्चेपूर्वी इराण प्रादेशिक शक्तींना सोबत घेत एक प्रकारचे ‘सुरक्षा कवच’ उभे करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायलवर कूटनीतिक दबाव निर्माण करता येईल. पाकिस्तानमध्ये होणारी आगामी शांतता चर्चा ‘गेम चेंजर’ ठरू शकते, असे मानले जात आहे. जर सौदी अरेबिया आणि इराण एखाद्या सामाईक भूमिकेवर सहमत झाले, तर पश्चिम आशियात युद्धविरामाच्या शक्यता अधिक मजबूत होऊ शकतात.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे की हिजबुल्लाहविरोधातील कारवाया थांबवण्यात येणार नाहीत. त्यांनी सांगितले की इस्रायली सैन्य पूर्ण ताकद आणि अचूक रणनीतीसह हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर कारवाई करत आहे. उत्तर इस्रायलमधील नागरिक सुरक्षितपणे आपल्या घरी परत येईपर्यंत आवश्यक तेथे हल्ले सुरूच राहतील. नेतन्याहू यांच्या या वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि, आव्हान अजूनही मोठेच आहे. अनेक वर्षांच्या वैर आणि हल्ल्यांच्या जखमा एका फोन कॉलने भरून निघतील का, याचे उत्तर काळच देईल. मात्र सध्या रियाध आणि तेहरान यांच्यातील हा संवाद सकारात्मक दिशेने जात असल्याचे दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode