

* मिसिंग लिंक प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाला मिळाला नवा वेग
रायगड, १ मे (हिं.स.) : “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; पण आम्ही ती केवळ जोडली नाही, तर विकासाला थेट वेग देणारी नवी कनेक्टिव्हिटी निर्माण केली,” असा घणाघाती हल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चढवला. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार करत, हा प्रकल्प म्हणजे वर्षानुवर्षे जनतेला भेडसावणाऱ्या ट्रॅफिकच्या डोकेदुखीवर सरकारने दिलेला ठोस आणि कायमस्वरूपी उपाय असल्याचे ठामपणे अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग क्षमता वाढ’ अंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण पार पडले. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, एम एस आर डी सी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, गृहनिर्माण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनील तटकरे, तसेच एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, अतिरीक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एफ्कॉन आणि नवयुग या कंपन्यांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, हा प्रकल्प खऱ्या अर्थाने “अभियांत्रिकी चमत्कार” (Engineering Marvel) असून अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत पूर्ण करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या प्रकल्पाचे लोकार्पण होणे ही अत्यंत अभिमानाची बाब असून त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला एक्सप्रेसवे असून त्यामागची संकल्पना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती. त्या वेळी नितीन गडकरी मंत्री होते आणि त्यांनी ही संकल्पना पुढे नेली. पूर्वी घाटामध्ये ८–१० तास रेंगाळावे लागायचे; मात्र एक्सप्रेसवे झाल्यानंतर प्रवास २ ते २.५ तासांत पूर्ण होऊ लागला आणि लोकांनी मुंबई–पुणे दरम्यान रोजचा प्रवास सुरू केला.मात्र घाटातील ट्रॅफिक जाम ही मोठी समस्या होती. लोकांना डोकेदुखी होत होती आणि जणू अमृतांजन बाम लावण्याची वेळ यायची. या पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’ हा प्रकल्प म्हणजे त्या डोकेदुखीवर “टायगर बामसारखा रामबाण उपाय” ठरणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यातून निर्माण होणारी आर्थिक वाढ अनेक पटीने अधिक असेल. पुण्यात आयटी, सर्व्हिस इंडस्ट्री आणि रिअल इस्टेटचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला, त्याप्रमाणे या प्रकल्पामुळे आणखी विकासाला चालना मिळेल.
या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासात ३० ते ४० मिनिटांची बचत होणार आहेच, शिवाय सातारा, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे. वेळ, इंधन आणि खर्च वाचणार असून प्रदूषण आणि अपघातांमध्येही मोठी घट होईल.
टायगर व्हॅली परिसरात १८२ मीटर उंचीचा व्हायडक्ट उभारण्यात आला असून तो भारतातील सर्वात उंच आहे. या कामाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. एवढ्या उंचीवर काम करणे अत्यंत कठीण होते. सुरुवातीला मजूर आणि अधिकारी घाबरून काम सोडून जात होते; त्यांना पुन्हा शोधून आणावे लागायचे, अशीही त्यांनी आठवण सांगितली.
शिंदे म्हणाले की, ते एमएसआरडीसी मंत्री असताना या प्रकल्पासाठी अनेक वेळा येथे आले होते. ब्लास्टिंगपासून ते प्रत्यक्ष कामाची पाहणी त्यांनी केली. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस होते आणि आजही त्यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. आपण भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील आपल्या हस्ते होत आहे, हा एक आगळावेगळा योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले.
मध्यंतरी “वर्क फ्रॉम होम” सरकारमुळे हा प्रकल्प काहीसा थंडावला होता; मात्र चार वर्षांपूर्वी पुन्हा आम्ही दोघांनी मिळून या प्रकल्पाला गती दिली. जे होणार नाही असे सांगून काहींनी हा प्रकल्प रद्द केला होता; पण “जे होणार नाही तेच आम्ही करून दाखवतो, त्यालाच महायुती सरकार म्हणतात,” असे शिंदे ठामपणे म्हणाले.
या प्रकल्पात अनेक अडचणी आणि आव्हाने होती. एमएसआरडीसीचे अधिकारी, अनिलकुमार गायकवाड आणि त्यांच्या टीमने अत्यंत चांगले काम केले. इच्छाशक्ती आणि सरकारचा पाठिंबा असेल तर कोणताही प्रकल्प पूर्ण करता येतो, हे या प्रकल्पातून सिद्ध झाले आहे.
वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून,पाण्याअभावी प्राणी रस्त्यावर येऊन अपघात होत होते; त्यामुळे त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पर्यावरणाला कोणतीही बाधा न आणता हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.
दररोज एक कोटी रुपयांपेक्षा अधिक इंधन बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक टनेल्स, सुरक्षा यंत्रणा आणि नियोजनामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित झाला आहे. अपघात झाल्यास तत्काळ उपाययोजना करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे घाट सेक्शन पूर्णपणे टाळता येणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे. लाखो-कोट्यवधी लोकांना याचा फायदा होणार असून लोक सरकारला नक्कीच दुवा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समृद्धी महामार्गासारखे अनेक प्रकल्प पूर्ण करून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम सुरू आहे. पूर्वी नागपूर–मुंबई प्रवासाला १८ ते २० तास लागत होते; आता तो ७ तासांत पूर्ण होतो. त्याचप्रमाणे मुंबई–पुणे प्रवासही अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेने महायुतीला दिलेल्या आशीर्वादाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “हे सरकार सर्वसामान्यांचे आहे आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे प्रकल्प आम्ही राबवत राहू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी