मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ ठरली आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार
रायगड, 01 मे (हिं.स.)। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. “ही केवळ मिसिंग लिंक नसून महाराष्ट्राच्या विकासाला जोडणारी ‘कनेक्टिंग लिंक’ आह
missing link


missing link


प्रमाणपत्र


बोगदा


मुख्यमंत्री


रायगड, 01 मे (हिं.स.)। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. “ही केवळ मिसिंग लिंक नसून महाराष्ट्राच्या विकासाला जोडणारी ‘कनेक्टिंग लिंक’ आहे,” असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील नमुना ठरवले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ७ हजार १८१ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून खोपोली ते कुसगाव दरम्यानचे अंतर ६ किलोमीटरने कमी होईल. त्यामुळे प्रवाशांचा तब्बल २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला सुमारे ७० हजार कोटी रुपयांची चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पामध्ये अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. बोगद्यांमध्ये वॉटर मिस्ट सिस्टीम, अग्निशमन यंत्रणा, दर ५० मीटरवर आपत्कालीन दूरध्वनी, तर दर ३०० मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे ‘कनेक्टर्स’ तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण मार्गावर २४ तास सीसीटीव्ही देखरेख आणि ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. नियम तोडणाऱ्यांना थेट ई-चलन पाठवले जाणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

या प्रकल्पातील दोन बोगदे हे जगातील सर्वाधिक रुंद बोगद्यांपैकी असून प्रत्येकी २३.५ मीटर रुंदीचे आहेत. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) तंत्रज्ञानाद्वारे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हे बोगदे खोदण्यात आले. यातील दुसरा बोगदा तब्बल ८.८६ किलोमीटर लांबीचा असून लोणावळा तलावाच्या पातळीपासून सुमारे १८० मीटर खाली तयार करण्यात आला आहे.

टायगर व्हॅलीतील ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल हा या प्रकल्पाचा आणखी एक आकर्षणबिंदू ठरला आहे. १२५ मीटर उंचीवर उभारण्यात आलेल्या या पुलासाठी १८२ मीटर उंचीचे दोन पायलॉन आणि २४० केबल्सचा वापर करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस, दऱ्या-खोऱ्या आणि वेगवान वाऱ्यांच्या परिस्थितीतही हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प “अभियांत्रिकी आणि राजकीय इच्छाशक्तीचा चमत्कार” असल्याचे सांगितले. कोविड काळातील अडथळ्यांवर मात करून अधिकाऱ्यांनी आणि कामगारांनी हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. महाराष्ट्रात ‘ॲक्सेस कंट्रोल ग्रीड’ उभारून राज्यातील कोणत्याही कोपऱ्यात ७-८ तासांत पोहोचता यावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी या प्रकल्पाला महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी संबोधले. घाटातील तीव्र वळणे टळल्यामुळे इंधन बचतीतून दररोज सुमारे १ कोटी रुपयांची बचत होणार असून प्रदूषणातही मोठी घट होईल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहतूक कोंडीवरील व्हिडिओचा उल्लेख करत, “सुप्रिया ताई, तुम्ही आज शेवटच्यांदा ट्रॅफिकमध्ये अडकला आहात,” असे मिश्किल वक्तव्य केले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ आता केवळ वाहतुकीचा पर्याय राहिलेला नसून महाराष्ट्राच्या विकासाचा, सुरक्षित प्रवासाचा आणि आधुनिक अभियांत्रिकी क्षमतेचा नवा चेहरा ठरणार आहे.

जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगद्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील

लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगद्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारले. हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना असून, घाट विभागातील वळणावळणाचा व धोकादायक प्रवास कमी करून अधिक सरळ, वेगवान आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून इंधन बचत आणि पर्यावरणीय लाभही साध्य होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande