
रायगड, 01 मे (हिं.स.)। : बिटकॉईनमध्ये पैसे गुंतविल्यास दरमहा नफा आणि पाच वर्षांनंतर मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलेची ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २ जून २०२४ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत मौजे बोडणी, ता. अलिबाग येथील फिर्यादी महिलेच्या राहत्या घरी आरोपी क्रमांक १ व २ यांनी संगनमत करून बिटकॉईनमध्ये पैसे गुंतविण्याचा प्रस्ताव दिला. “माझ्यामार्फत पैसे गुंतवा, तुम्हाला दरमहा १० हजार रुपये तसेच पाच वर्षांनंतर ५ लाख रुपये मिळतील,” असे सांगून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपी क्रमांक २ व ३ यांनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने रोख रक्कम तसेच गुगल पेच्या माध्यमातून एकूण ६९ हजार रुपये घेतले. मात्र, घेतलेली रक्कम परत न करता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच “पोलिसात तक्रार केल्यास पैसे परत मिळणार नाहीत,” अशी धमकीदेखील दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुरनं. ५४/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार नितीन जगताप करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)