सोमनाथ अमृत महोत्सव भारतासाठी एक मार्गदर्शक प्रेरणा ठरेल : पंतप्रधान
गांधीनगर, 11 मे (हिं.स.) - सोमनाथ अमृत महोत्सव केवळ स्मरणरंजनापुरता मर्यादित नाही. हा केवळ भूतकाळाचा उत्सव नाही, तर पुढील एक हजार वर्षांसाठी भारताची प्रेरणा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्ब
मोदी सोमनाथ मंदिर


मोदी सोमनाथ मंदिर


गांधीनगर, 11 मे (हिं.स.) - सोमनाथ अमृत महोत्सव केवळ स्मरणरंजनापुरता मर्यादित नाही. हा केवळ भूतकाळाचा उत्सव नाही, तर पुढील एक हजार वर्षांसाठी भारताची प्रेरणा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर झालेल्या लोकार्पणाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी झाले होते.

सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या 75 व्या वर्षानिमित्त, या मंदिर परिसरात आयोजित सभेला त्यांनी संबोधित केले. हा केवळ, एक समारंभ नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, भारताचे अविनाशी चैतन्य आणि सांस्कृतिक चिवटपणा, याची ही एक घोषणा आहे. या क्षणांचे साक्षीदार ठरलेल्या सगळ्या भाविकांनी, राष्ट्राच्या स्वाभिमानाशी गुंफलेल्या, आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव इथे घेतला आहे, वैदिक मंत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सागरी लाटांची गर्जना, या पवित्र स्थळाचा पुनर्स्थापनेचा उत्सव साजरा होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारताच्या प्राचीन शास्त्रातील आध्यात्मिक ज्ञानाचा दाखला देत, पंतप्रधान म्हणाले, ‘ही संपूर्ण सृष्टी परमेश्वरापासून निर्माण होते आणि अखेरीस त्याच्यामध्ये विलीन होते. आज आपण त्याच परमेश्वराच्या धामाच्या पुनर्निर्माणाचा उत्सव साजरा करत आहोत. या मंदिराप्रती आपली वैयक्तिक श्रद्धा असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी दादा सोमनाथांचे परमभक्त म्हणून मंदिराला दिलेल्या असंख्य भेटींची आठवण सांगितली. “मी अनेक वेळा त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आहे, पण आज येथे येताना हा काळाचा प्रवास मला एक विलक्षण आनंददायी अनुभूती देत होता,” असे मोदी म्हणाले.

सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्त, काही महिन्यांपूर्वी या मंदिराला दिलेल्या भेटीचे स्मरण करत, पंतप्रधानांनी, अगदी थोड्या काळात दोन उत्सवांत सहभागी होण्याचे आगळे वेगळे वैशिष्ट्य सांगितले. “पहिल्या विध्वंसाच्या हजार वर्षांनंतर सोमनाथाचा गौरव अविनाशी राहिला आहे आणि आज या आधुनिक स्वरूपाच्या प्राणप्रतिष्ठेला 75 वर्षे पूर्ण होत असताना, आपल्याला या हजार वर्षांच्या चिरकाल प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी लाभली आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

1951 च्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल पंतप्रधान म्हणाले की, हा सामान्य प्रसंग नव्हता. भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला, आणि 1951 मध्ये सोमनाथच्या प्राणप्रतिष्ठेने भारताच्या स्वतंत्र चेतनेची घोषणा केली, असे मोदी यांनी नमूद केले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या चार वर्षांनी, 1951 मध्ये मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकतांना पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 500 संस्थानांच्या राजकीय विलीनीकरणाचा आणि त्यांच्या सोमनाथच्या पुनर्बांधणीच्या निर्धाराचा उल्लेख केला. राष्ट्र परकीय बेड्यांमधून मुक्त झाले, तेव्हा सोमनाथच्या जीर्णोद्धाराने जगाला हा संदेश दिला की भारत केवळ स्वतंत्र झालेला नाही, तर तो आपले प्राचीन वैभव पुन्हा प्राप्त करत आहे, असे मोदींनी सांगितले.

या प्रसंगाचे बहुआयामी महत्त्व सांगताना पंतप्रधान म्हणाले की, हा केवळ 75 वर्षांचा मागोवा घेणारा साक्षीदार नाही. विनाशातही सृजनाचा जो संकल्प सोमनाथने पूर्ण केला आहे, तो मी इथे पाहत आहे, असे मोदी म्हणाले. त्यांनी पवित्र परिसरात असत्यावर सत्याचा शाश्वत विजय अनुभवल्याचे सांगितले.

पंतप्रधानांनी जागतिक कल्याणाचे धडे देणाऱ्या हजारो वर्षांच्या आध्यात्मिक चेतनेबद्दल सांगितले. सोमनाथच्या लवचिकतेमध्ये त्यांनी भारताच्या अक्षय स्वरूपाचे दर्शन घडवले. मी इथे भारताचे जे अक्षय रूप पाहत आहे, ते शतकानुशतके केलेल्या क्रूर प्रयत्नांनीही पुसले गेले नाही आणि त्याचा पराभव होऊ शकला नाही, असे मोदींनी ठासून सांगितले.

या दिवसाचा राष्ट्रीय इतिहासातील दुसऱ्या एका ऐतिहासिक घटनेशी संबंध जोडताना त्यांनी 11 मे हा 1998 मधल्या भारताच्या पोखरण अणुचाचणीचा वर्धापन दिन सुद्धा आहे, याची आठवण करून दिली. देशाने 11 मे रोजी तीन अणुचाचण्या करून भारतीय शास्त्रज्ञांची क्षमता सिद्ध केली, असे त्यांनी सांगितले. त्यांनी 13 मे रोजी झालेल्या आणखी दोन चाचण्यांचा उल्लेख भारताच्या अढळ राजकीय संकल्पाचा पुरावा म्हणून केला. त्या वेळी संपूर्ण जगाचा दबाव भारतावर होता, मात्र,अटलजींच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे आणि जगातील कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही किंवा दबावाखाली आणू शकत नाही, हे दाखवून दिले असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

या मोहिमेच्या नावाचे महत्त्व स्पष्ट करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, पोखरण अणुचाचणीला 'ऑपरेशन शक्ती' हे नाव सखोल सांस्कृतिक कारणांमुळे देण्यात आले होते. कारण शिवाच्या बरोबरीने शक्तीची पूजा करणे ही आपली परंपरा राहिली आहे, असे मोदी म्हणाले. हिंदू प्रतिमेचा संदर्भ देत अर्धनारीश्वर शिव हे शिव आणि शक्तीच्या अविभाज्यतेचे दर्शन घडवतात, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताची चांद्रयान मोहीम चंद्रावर यशस्वीपणे उतरली, तेव्हा त्या स्थळाचे नाव याच तत्त्वज्ञानानुसार ठेवण्यात आले होते, याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. शब्दांच्या व्युत्पत्तीचा संबंध जोडताना त्यांनी प्राचीन ज्ञान आणि आधुनिक कर्तृत्वाच्या संगमाबद्दल आनंद व्यक्त केला. या ज्योतिर्लिंगाला चंद्राच्या (सोम) नावावरून सोमनाथ म्हटले जाते हे किती सुखद आहे, असे मोदी म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande