शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १४५६ अंकांनी कोसळला
- गुंतवणूकदारांचे १०.२२ लाख कोटी रुपये बुडाले नवी दिल्ली, 12 मे (हिं.स.)। भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली विक्रमी घसरण आणि जागतिक आर्थिक अनिश्चितत
Stock Market Closing


- गुंतवणूकदारांचे १०.२२ लाख कोटी रुपये बुडाले

नवी दिल्ली, 12 मे (हिं.स.)। भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली विक्रमी घसरण आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून आला आणि प्रमुख निर्देशांकांमध्ये तीव्र पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १४५६.०४ अंकांनी घसरून ७४,५५९.२४ वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० निर्देशांक ४३६.३० अंकांनी कोसळत २३,३७९.५५ या पातळीवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ७४,४४९.५० पर्यंत खाली घसरला होता, तर निफ्टी २३,३४८.४० या नीचांकी स्तरावर पोहोचला.शेअर बाजारात घसरणीचा हा सलग चौथा दिवस आहे. गेल्या चार दिवसांत निर्देशांकात सुमारे 3,500 अंकांची आणि निफ्टीत सुमारे 1,000 अंकांची घसरण झाली आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०५ डॉलरच्या पुढे गेल्याने भारतासारख्या आयात-आधारित अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून आयात खर्च आणि चालू खाते तुटीबाबतही चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केल्याने बाजारातील दबाव आणखी वाढला.

डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. रुपयातील कमजोरीचा परिणाम थेट शेअर बाजारावर झाला आणि विक्रीला अधिक वेग मिळाला. निफ्टीच्या साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. माहिती तंत्रज्ञान आणि स्थावर मालमत्ता निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक कोसळले, तर वाहन क्षेत्रात २ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. मध्यम आणि लघु उद्योग समूहातील समभागांमध्येही मोठी पडझड झाली.

या घसरणीचा सर्वात मोठा फटका गुंतवणूकदारांच्या संपत्तीला बसला. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ११ मे रोजी ४,६६,५८,५६९ कोटी रुपये होते. ते १२ मे रोजी घसरून ४,५६,९९,९४५ कोटी रुपयांवर आले. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल १०,२२,८१९ कोटी रुपयांची घट झाली.

मुंबई शेअर बाजारात एकूण ४४१० समभागांमध्ये व्यवहार झाला. त्यापैकी फक्त ८६९ समभाग वाढीसह बंद झाले, तर ३४१२ समभाग घसरले. ९३ समभागांनी वर्षातील उच्चांक गाठला, तर ४५ समभाग वर्षातील नीचांकी स्तरावर पोहोचले. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी केवळ भारतीय स्टेट बँकेचा समभाग वाढीसह बंद झाला, तर टेक महिंद्राच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.

बाजारपेठेतील आजच्या व्यापारात रिअल्टी आणि आयटी समभागांमध्ये सर्वात जास्त घसरण झाली आहे. दुसरीकडे, टी. सी. एस., इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एच. सी. एल. टेक यांचे समभाग 4.5 टक्क्यांपर्यंत घसरले. दुसरीकडे, वाहन, वित्तीय सेवा, एफएमसीजी, मीडिया, फार्मा, पीएसयू बँका आणि खासगी बँकांमध्ये 2.5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती, रुपयातील चढ-उतार आणि जागतिक तणाव कायम राहिल्यास आगामी काही दिवस शेअर बाजारात अस्थिरता सुरू राहू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या सावध भूमिका घेत दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

तत्पूर्वी, सोमवारी व्यापार सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. निर्देशांक 1,313 अंकांच्या घसरणीसह 76,015 वर बंद झाला. निफ्टीयाही 360 अंकांच्या घसरणीसह 23,815 वर बंद झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande