हिंगोली जिल्ह्यासाठी १४ व १५ मे रोजी यलो अलर्ट जारी
छत्रपती संभाजीनगर, 13 मे (हिं.स.)। प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी दिनांक १४ व १५ मे २०२६ या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्माघाताची शक्यता अधिक असल्याचा अंदाज व्यक्त
हिंगोली जिल्ह्यासाठी १४ व १५ मे रोजी यलो अलर्ट जारी


छत्रपती संभाजीनगर, 13 मे (हिं.स.)। प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी दिनांक १४ व १५ मे २०२६ या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्माघाताची शक्यता अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच स्थूल व्यक्तींनी उष्णतेपासून बचावासाठी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने नमूद केले आहे.

*उष्मालाट काळात घ्यावयाची काळजी*

तहान नसली तरी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड किंवा यकृतविषयक आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत.

ओआरएस, लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावेत.

हलक्या रंगाचे, सैलसर व सुती कपडे वापरावेत.

घराबाहेर जाताना डोके झाकावे, टोपी, छत्री व गॉगलचा वापर करावा. त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर करावा.

अतिउष्णतेचा त्रास होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवावे.

*नागरिकांनी टाळावयाच्या बाबी*

विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात जाणे व श्रमाची कामे करणे टाळावे.

अनवाणी बाहेर फिरू नये.

अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करताना स्वयंपाकघर हवेशीर राहील याची काळजी घ्यावी.

दारू, चहा, कॉफी व शीतपेये यांचे सेवन टाळावे, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

जास्त मीठ, तिखट, तेलकट तसेच उच्च प्रथिनयुक्त अन्नपदार्थ टाळावेत. शिळे अन्न सेवन करू नये.

उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात लहान मुले किंवा प्राणी ठेवू नयेत.

अनावश्यक उष्णता निर्माण करणारे चमकदार दिवे किंवा बल्बचा वापर टाळावा.

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande