
निमाव भारतीय मानक ब्युरोच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम
नाशिक, 16 मे (हिं.स.)। उत्पादन प्रक्रियेत गुणवत्ता मानकांचे काटेकोर पालन केल्यास उत्पादनाचा दर्जा उंचावतो आणि देशाची निर्यात वाढण्यास मदत होते. भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ही संस्था उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचा महत्त्वपूर्ण दुवा असून ती ‘गुणवत्तेची हमी’ देणारी सर्वोच्च राष्ट्रीय संस्था आहे, असे प्रतिपादन बीआयएसच्या मुंबई शाखेचे प्रमुख व शास्त्रज्ञ आर. आर. सिंग यांनी केले.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि भारतीय मानक ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने बीआयएसने घालून दिलेल्या मानकांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी निमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात उद्योजकांना मार्गदर्शन करताना सिंग बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, विद्युत निरीक्षक भागवत उगले, निमा उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, बीआयएसचे तांत्रिक व निमा उप-समिती सदस्य श्रीकांत पाटील तसेच बीआयएसचे सहसंचालक शीतल पाटील उपस्थित होते.
बीआयएस ही भारतातील वस्तूंची गुणवत्ता, मानके आणि प्रमाणीकरण यासाठीची सर्वोच्च संस्था आहे. विविध उत्पादनांसाठी मानके निश्चित करणे, आयएसआय (ISI) मार्क किंवा इतर प्रमाणपत्रे देणे, ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार उत्पादने उपलब्ध होतील याची खात्री करणे ही संस्थेची प्रमुख कार्ये आहेत. तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांची शुद्धता तपासून त्यांना प्रमाणित करणे आणि उत्पादनांना आयएसआय मार्कद्वारे गुणवत्ता व सुरक्षा प्रमाणित करणे हीदेखील बीआयएसची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. बीआयएसमुळे भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या वस्तूंची गुणवत्ता व सुरक्षितता टिकून राहते आणि ग्राहकांना निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांपासून संरक्षण मिळते, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.
उद्योजकांच्या उत्पादनवाढीसाठी आणि गुणवत्तावाढीसाठी बीआयएसच्या मानकांची कास धरणे आवश्यक आहे. बीआयएसने अशा प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने आयोजित करावेत आणि त्यासाठी निमाचे पूर्ण सहकार्य राहील, असे निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी प्रास्ताविकात सांगितले. निमा या औद्योगिक संघटनेच्या प्रयत्नांमुळे गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यात यश आले आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच २०२६ पर्यंत नाशिक जिल्ह्यात दोन हजार एकर क्षेत्र औद्योगिक वापरासाठी खुले होणार असल्याचा विश्वासही नहार यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV