रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा
रत्नागिरी, 17 मे (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता असून नागरिकांना कडक उन्हासह वादळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात सध्या अध
रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा


रत्नागिरी, 17 मे (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता असून नागरिकांना कडक उन्हासह वादळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात सध्या अधूनमधून पावसाच्या सरी पडत असून यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचे संकेत आहेत. वातावरणात मळभ वाढू लागले असून पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण व दमट वातावरण कायम राहणार असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सोमवारी, दि. १८ मे रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता असून १९ व २० मे रोजी पावसाचा जोर काहीसा कमी राहील. मात्र काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या सरी कोसळू शकतात, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शनिवारी जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. सकाळी ११ नंतर बाहेर पडणे कठीण होत आहे.

पावसाचे संकेत मिळत असले तरी आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande