
अमरावती, 16 मे (हिं.स.)
अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक मोहीम सुरू ठेवत तळेगाव दशासर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या कारवाईत ५५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि एक लाख ४० हजार रुपये किमतीची १४ ब्रास कन्हान रेती असा एकूण ५६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी (ता.१५) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास तळेगाव दशासर पोलिस स्टेशनचे पथक हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, समृद्धी महामार्ग परिसरातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत एम.एच.२७ डी.झेड. २११४ क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेतला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विनारॉयल्टी १४ ब्रास कन्हान रेती आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी ट्रकसह रेती जप्त केली. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल अमर काळे यांच्या फिर्यादीवरून चालक शरीफ बुद्धू लुचईवाले तसेच ट्रक मालक ख्वाजा सलमान अब्दुल रहमान यांच्या विरोधात तळेगाव दशासर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार, पोलिस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दशासरचे ठाणेदार किरण औटे, हेड कॉन्स्टेबल पवन अलोने, कॉन्स्टेबल अमर काळे, पंकज शेडे आणि गौतम गवळे यांनी पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी