अमरावती मनपाची नवी प्रशासकीय इमारत व टाऊन हॉल पुनर्निर्माण प्रस्ताव
अमरावती, 16 मे (हिं.स.) : अमरावती महानगरपालिका प्रशासनाने नव्या प्रशासकीय इमारतीसह टाऊन हॉलच्या पुनर्निर्माणाचा प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे सादर करण्याची तयारी केली आहे. शहरातील वाढत्या कार्यालयीन गरजा आणि सध्याच्या इमारतीची जीर्ण अवस्था लक्षात घेऊन
मनपा प्रशासकीय इमारतीसाठी जागा मागणार


अमरावती, 16 मे (हिं.स.) : अमरावती महानगरपालिका प्रशासनाने नव्या प्रशासकीय इमारतीसह टाऊन हॉलच्या पुनर्निर्माणाचा प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे सादर करण्याची तयारी केली आहे. शहरातील वाढत्या कार्यालयीन गरजा आणि सध्याच्या इमारतीची जीर्ण अवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या राजकमल चौकातील मनपाची प्रशासकीय इमारत अपुरी पडत असून तिची अवस्थाही जीर्ण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व कार्यालये आणि झोन कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी प्रशस्त जागेची आवश्यकता भासत आहे.

प्रस्तावात दोन जागांचा पर्याय देण्यात आला आहे. पहिला पर्याय मोसीकॉल विलासनगर येथील सुमारे पाच एकर जागेचा असून ही जमीन बियाणे महामंडळाच्या मालकीची आहे. दुसरा पर्याय नवीन तहसील कार्यालयालगतची सुमारे दीड एकर महसूल विभागाची जागा आहे.

प्रशासनाच्या मते, विलासनगर येथील जागा मिळण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. त्यामुळे नवीन तहसील कार्यालयालगतची जागा मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न सुरू आहेत. ही जमीन महसूल विभागाच्या अखत्यारीत असल्याने आणि पालकमंत्री महसूल विभागाशी संबंधित असल्याने त्या ठिकाणी प्रकल्प होण्याची शक्यता अधिक असल्याचे मानले जात आहे.

नव्या इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालयांसोबत झोन कार्यालयांचाही समावेश करण्याची योजना असून, संपूर्ण मनपा प्रशासन एका ठिकाणी आणण्याचा उद्देश आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande