दिवसा घरफोड्यांनी निलंग्यात दहशत; सराईत चोरटा जेरबंद, ३.३८ लाखांचा ऐवज जप्त
लातूर, 17 मे (हिं.स.)। निलंगा शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर लातूर पोलीस यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपीकडून तब्बल ३ लाख ३८ हजार १२५ रुपयांचे सोन्याचे दागिने व
पोलीस कारवाई


लातूर, 17 मे (हिं.स.)। निलंगा शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर लातूर पोलीस यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपीकडून तब्बल ३ लाख ३८ हजार १२५ रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे निलंगा परिसरातील सलग घरफोडीच्या घटनांचा उलगडा झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून निलंगा शहरातील आर्य समाज गल्ली, ब्राईट गिरीजा नगरी, दापका आणि शिवाजीनगर परिसरात दिवसाढवळ्या बंद घरांचे कुलूप तोडून चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे पथक निलंगा परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, निलंगा-औसा रोडवरील मीना निंबाळकर पेट्रोलपंपासमोर एक संशयित इसम चोरीचे सोन्याचे दागिने घेऊन उभा आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमाने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव राजु ऊर्फ राजाराम कुंडलीक म्हेत्रे (वय २९, रा. शिवाजीनगर, निलंगा) असे सांगितले.

आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून सोन्याच्या अंगठ्या, कानातील झुमके तसेच १० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने निलंगा शहरातील विविध भागात दिवसाढवळ्या घरफोड्या केल्याची कबुली दिली. तपासात निलंगा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे क्रमांक ९३/२०२६, ९४/२०२६ आणि १३७/२०२६ दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपीकडून एकूण ४९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून जप्त मुद्देमालाची किंमत ३ लाख ३८ हजार १२५ रुपये इतकी आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून बंद घरांची रेकी करून घरमालक बाहेर गेल्यानंतर कुलूप तोडून चोरी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे तसेच सायबर सेलचे शैलेष सुडे यांनी केली. आरोपीला पुढील तपासासाठी निलंगा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande