
जळगाव, 19 मे (हिं.स.)जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये प्रत्येकी एक हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे ऐन लग्नसराई आणि गुंतवणुकीच्या हंगामात ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
सुवर्णनगरी जळगाव बाजारात आजच्या दरानुसार सोन्याचा भाव प्रति किलो १ लाख ५७ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर १ लाख ६२ हजार २२५ रुपयांपर्यंत गेला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो २ लाख ७२ हजार रुपयांवर पोहोचला असून जीएसटीसह चांदी २ लाख ८० हजार १६० रुपयांवर विकली जात आहे. सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, डॉलरच्या किमतीतील अस्थिरता, जागतिक आर्थिक घडामोडी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी वाढलेली मागणी यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आयात शुल्कातील बदलांचाही थेट परिणाम बाजारावर होत असल्याचे सांगितले जात आहे. भाववाढीमुळे किरकोळ ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असले तरी दीर्घकालीन गुंतवणूकदार मात्र सोन्या-चांदीकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहत असल्याचे चित्र सराफा बाजारात दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर