वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबादची जागा बदलावी; आ. सुलभाताई खोडके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अमरावती, 02 मे (हिं.स.)। अमरावती येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आलेली मौजे आलियाबाद येथील जागा वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने ती बदलून शहराच्या मध्यवर्ती भागात पर्यायी जागा निश्चित करावी, अशी माग
वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबादची जागा बदलावी; आ. सुलभाताई खोडके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


अमरावती, 02 मे (हिं.स.)।

अमरावती येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आलेली मौजे आलियाबाद येथील जागा वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने ती बदलून शहराच्या मध्यवर्ती भागात पर्यायी जागा निश्चित करावी, अशी मागणी आमदार सुलभ खोडके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवले आहे.पत्रात नमूद केल्याप्रमाणे, आलियाबाद येथील प्रस्तावित जागा ‘आयडेंटिफाइड फॉरेस्ट’ क्षेत्रात येत असल्याने केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही वनेत्तर काम करता येत नाही. त्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ही जागा शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावर असल्याने रुग्णांना, विशेषतः मेळघाटातील नागरिकांना, तेथे पोहोचणे गैरसोयीचे ठरणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्देश सर्वसामान्यांना सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा असल्याने हे महाविद्यालय शहराच्या मध्यवर्ती भागातच असावे, अशी ठाम भूमिका आ. खोडके यांनी मांडली आहे. त्यांनी पर्यायी जागा म्हणून स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसरातील सुमारे २३ एकर जागा, पंजाबराव कृषी विद्यापीठ परिसरातील जागा, रहाटगाव येथील जमीन तसेच कापूस पणन महासंघाची मध्यवर्ती जागा यांचा प्राधान्याने विचार करावा, असे सुचविले आहे.जनहित आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन आलियाबाद येथील जागेचा पुनर्विचार करून योग्य पर्यायी जागेस तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande