
चंद्रपूर, 02 मे, (हिं.स.)। गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे परीक्षा प्रणाली अधिक सक्षम व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सेंटर आज पासून सुरू झाले. या केंद्राचे उद्घाटन आज कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते झाले . यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे , वित्त व लेखाधिकारी सी. ए. भास्कर पठारे, परीक्षा संचालक डॉ. धनराज पाटील, नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदाजी सातपुते , सिनेट सदस्य तथा प्रा. उत्तमचंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन प्रणालीमुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि अचूक होणार आहे. मानवी त्रुटी कमी होऊन मूल्यमापनाची विश्वासार्हता वाढेल. याशिवाय, ही प्रणाली वेगवान व कार्यक्षम असून निकाल वेळेत जाहीर करण्यास मदत करेल, ज्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. डिजिटल प्रक्रियेमुळे माहितीची सुरक्षितता अधिक वाढेल.मूल्यमापनात एकसमानता राखली जाईल आणि कागदाच्या वापरात घट झाल्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमांनाही चालना मिळेल.
उद्घाटन कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. नंदकिशोर मेश्राम हे या केंद्राचे मुख्य मूल्यांकन अधिकारी असून डॉ. कृष्णा कारू हे सह मूल्यांकन अधिकारी म्हणून कार्यभार पाहत आहेत.
“ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सेंटरची स्थापना ही उच्च शिक्षणातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीची गुणवत्ता आणि विश्वासार्हता अधिक बळकट होईल.”
-कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव