
रायगड, 2 मे, (हिं.स.) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. 2) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. कोकण विभागात रायगड जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले असून जिल्ह्याचा निकाल 93.69 टक्के लागला आहे. निकालात मुलींनी पुन्हा एकदा मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातून 30 हजार 558 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 30 हजार 470 विद्यार्थी परीक्षेला बसले. यामधील 28 हजार 549 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.13 टक्के इतके राहिले असून मुलांचे प्रमाण 91.22 टक्के आहे. त्यामुळे निकालात मुलींचे वर्चस्व कायम राहिल्याचे दिसून आले. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने सर्वाधिक 98.57 टक्के निकाल नोंदवला. वाणिज्य शाखेचा निकाल 91.29 टक्के, कला शाखेचा 86.03 टक्के, किमान कौशल्य शाखेचा 89.59 टक्के तर तंत्रविज्ञान शाखेचा निकाल 92.40 टक्के लागला आहे.
तालुकानिहाय निकालात श्रीवर्धन तालुका 97.11 टक्क्यांसह जिल्ह्यात प्रथम ठरला. तळा तालुक्याचा निकाल 96.69 टक्के तर कर्जत आणि म्हसळा तालुक्यांचा प्रत्येकी 96.31 टक्के निकाल लागला. खालापूर तालुक्याचा निकाल सर्वात कमी 85.02 टक्के नोंदवण्यात आला.
निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकमेकांचे अभिनंदन करत जल्लोष साजरा केला. आता उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेला वेग येणार असून विद्यार्थ्यांच्या करिअरच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)