छत्तीसगडमध्ये भूसुरुंग स्फोटात तीन जवानांना वीरमरण, एक जखमी
रायपूर, 02 मे (हिं.स.) - छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाने तीन जवानांना वीरमरण आले आहे. कांकेर-नारायणपूर सीमावर्ती भागात ‘आयईडी’ निकामी करण्याच्या मोहिमेवर असताना झालेल्या भीषण स्फोटात ‘जिल्हा रिझर्व्ह गार्ड’चे (डीआ
IED Blast


रायपूर, 02 मे (हिं.स.) - छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाने तीन जवानांना वीरमरण आले आहे. कांकेर-नारायणपूर सीमावर्ती भागात ‘आयईडी’ निकामी करण्याच्या मोहिमेवर असताना झालेल्या भीषण स्फोटात ‘जिल्हा रिझर्व्ह गार्ड’चे (डीआरजी) तीन जवान शहीद झाले असून, एक जवान गंभीर जखमी झाला आहे. या घटनेवर मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी शोक व्यक्त केले आहे.

बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पट्टिलिंगम यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती. या नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बस्तरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि भूसुरुंग पेरून ठेवण्यात आले आहेत. ही स्फोटके शोधून ती निकामी करण्यासाठी जिल्हा पोलीस आणि डीआरजी जवानांची एक विशेष तुकडी छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘डी-माइनिंग’ मोहीम राबवत होती. ही मोहीम सुरू असतानाच एका जिवंत भूसुरुंगाचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटात चार जवान गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डीआरजी प्रभारी सुखराम वट्टी, कृष्णा कोमरा आणि संजय गढपाले यांची प्राणज्योत मालवली. परमानंद कोमरा हे या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संपूर्ण परिसरात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला असून, अतिरिक्त कुमक घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande