शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
रायगड, 02 मे (हिं.स.) : मुरुड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०/२०२६ मधील फिर्यादी यांना तपासकामी
Confusion at Murud police station


रायगड, 02 मे (हिं.स.) : मुरुड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०/२०२६ मधील फिर्यादी यांना तपासकामी मुरुड पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडे पोलीस दप्तरी कक्षात विचारपूस सुरू असताना संबंधित गुन्ह्यातील आरोपींची दोन मुले तेथे आली. पोलिसांनी आरोपी क्रमांक १ यास नाव व पत्ता विचारला असता त्यावरून वाद निर्माण झाला.

यानंतर दोघांनी संगनमत करून पोलीस ठाण्यात मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तसेच तेथील ठाणे अंमलदार यांच्याशी हुज्जत घालत त्यांना मारण्यासाठी अंगावर धावून गेल्याचा आरोप आहे. “तुम्हाला बघून घेतो,” अशी धमकी देत त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला तसेच सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३/२०२६ दाखल करण्यात आला असून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११२, ११७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १३२, २२१, ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सफौ/गदमले करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande