
नंदुरबार, 02 मे, (हिं.स.) उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी वाहनांसाठी एमएच-09-एटी ही नवीन नोंदणी मालिका सुरू केली असून या मालिकेतील आकर्षक (VIP) आणि पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी इच्छुकांनी 4 मे 2026 पर्यंत अर्ज करावे असे आवाहन सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल नलावडे यांनी केले आहे.
दुचाकी वाहनांसाठी 'MH 39-AT' ही मालिका 0001 ते 9999 या क्रमांकांसह उपलब्ध असेल. ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकीसाठी विशेष किंवा 'उडते' क्रमांक हवे आहेत, त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक शुल्काचा स्वतःच्या स्वाक्षरीचा धनादेश (Cheque) सीलबंद पाकिटात जमा करावा लागेल. जर एखाद्या विशिष्ट क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर त्या क्रमांकाचे वाटप लिलाव पद्धतीने केले जाईल. अशा परिस्थितीत: अर्जदारांना विहित शुल्काव्यतिरिक्त अधिक रकमेचा धनादेश सीलबंद पाकिटात द्यावा लागेल. ज्या अर्जदाराचा धनादेश सर्वाधिक रकमेचा असेल, त्याला तो विशिष्ट क्रमांक बहाल करण्यात येईल. इच्छुक वाहनधारकांनी आपले अर्ज 04 मे 2026 रोजी दुपारी 5-00 वाजेपर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावे वेळेनंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. जुनी मालिका संपल्यानंतर लगेचच ही नवीन मालिका कार्यान्वित केली जाईल, असेही सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नलावडे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर