पुणे, 02 मे, (हिं.स.)।
पुणे पोलीस दलातून बदली झालेल्या आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक महिलेला तक्रार अर्जाच्या चौकशी प्रकरणात २८ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बंडगार्डन रस्त्यावर पकडले. या प्रकरणात एका खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, बंडगार्डन रस्त्यावरील एका तारांकित हाॅटेलसमोर शनिवारी ही कारवाई करण्यात आली. २८ लाख रुपयांची लाच घेताना महिला पोलीस अधिकाऱ्याला पकडल्यानंतर पुणे पोलीस दलात खळबळ उडाली.
तोटेवार यांना ताब्यात घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तोटेवार यांच्या पुणे पोलीस आयुक्तालयातील कार्यालय, तसेच निवासस्थानाची झडती घेण्यास सुरुवात केली. तोटेवार यांच्यासह आणखी एकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तोटेवार या पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्तीस होत्या. त्यांची नुकतीच पदोन्नतीने मुंबई लोहमार्ग पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. त्यांना शुक्रवारी (१ मे) पुणे पाेलीस दलातून कार्यमुक्त करण्यात आले. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत त्या नियुक्तीस असताना त्यांच्याकडे आठ ते नऊ तक्रार अर्ज चौकशीसाठी सोपविण्यात आले होते. त्या पैकी एका तक्रार अर्जाच्या चौकशीच्या अनुषंगाने सहायक निरीक्षक तोटेवार यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने सुरुवातीला दोन लाख रुपये तोटेवार यांना दिले होते. त्यानंतर उर्वरित २८ लाख रुपयांची लाच त्यांनी मागितली. त्यानंतर तक्रारदाराने तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी बंडगार्डन रस्त्यावरील एका तारांकित हाॅटेलसमोर सापळा लावला. तोटेवार यांनी एका खासगी व्यक्तीला लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी तेथे पाठविले. सापळा लावून त्याला पकडण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु