
कोपनहेगन, 02 मे (हिं.स.)भारताचा अव्वल मानांकित पुरुष बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, दुखापतीमुळे फ्रान्सविरुद्ध होणारी थॉमस कप २०२६ ची उपांत्य फेरीची लढत खेळू शकणार नाही. या वृत्ताला 'बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया'ने दुजोरा दिला आहे.
उपांत्यपूर्व फेरीतील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यादरम्यान, ज्यामध्ये लक्ष्यला अनेकदा 'डाइव्ह' (झुकून फटके मारणे) करावे लागले होते, त्याच्या कोपराला दुखापत झाली, असे बीएआयने स्पष्ट केले आहे.
संघाच्या वैद्यकीय पथकाने केलेल्या सखोल तपासणीनंतर, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून लक्ष्यला दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. आणि जर भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर त्या सामन्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त स्थितीत असेल, असे बीएआयचे सरचिटणीस संजय मिश्रा यांनी जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या त्याच्यावर वैद्यकीय पथकाचे बारकाईने लक्ष असून, त्याला सर्व आवश्यक वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. लक्ष्य लवकरच दुखापतीतून सावरेल आणि पुन्हा आपल्या सर्वोत्तम लयीत परत येईल, याबद्दल संपूर्ण संघ पूर्णपणे आशावादी आणि आत्मविश्वासू आहे, असेही मिश्रा यांनी पुढे सांगितले.
उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्याच सामन्यात लक्ष्यने आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या 'चोऊ टिएन चेन'चा १८-२१, २२-२०, २१-१७ ने पराभव केला होता. लक्ष्यच्या या विजयामुळेच भारताच्या ३-० अशा एकतर्फी विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.
पुरुष एकेरीच्या लढतींमध्ये आयुष शेट्टी, किदाम्बी श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय हे भारतीय बॅडमिंटनपटू सहभागी होतील. तर दुहेरीच्या सामन्यांमध्ये सात्विक रंकीरेड्डी/चिराग शेट्टी आणि एम. अर्जुन/ए. हरिहरन या जोड्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे