
जळगाव, 21 मे (हिं.स.) : गुरुपुष्यामृत योगासारखा अत्यंत शुभ मुहूर्त असतानाच जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या आणि खरेदीच्या मुहूर्तावर झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरात थेट 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. नव्या दरानुसार जीएसटीसह सोन्याचा भाव 1 लाख 62 हजार 225 रुपये, तर चांदीचा भाव 2 लाख 78 हजार 100 रुपयांवर पोहोचला आहे.
सुवर्ण व्यावसायिकांच्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणला युद्धासंदर्भात तडजोड व तोडगा काढण्यासाठी आणखी एक संधी दिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. जागतिक बाजारपेठेतील या बदलांचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर झाला असून सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे.
दरम्यान, गुरुपुष्यामृत योग हा हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा असल्याने सकाळपासूनच जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांना अधिक खर्च करावा लागणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक घडामोडींमुळे आगामी काळातही सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार कायम राहू शकतात.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर