
मुंबई, 22 मे (हिं.स.)। अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'जवानी तो इश्क होना है' (Jawani Toh Ishq Hona Hai) मुळे चर्चेत आहे. त्याचे वडील डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे या अभिनेत्रीही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ५ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या घडामोडींच्या दरम्यानच, वरुणबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तो आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण धवन सध्या एका हॉलिवूड प्रकल्पाबाबत प्रसिद्ध अमेरिकन निर्माता लॉरेन्स कासानॉफ यांच्याशी चर्चा करत आहे. गेल्या काही आठवड्यांत या दोन्ही पक्षांमधील चर्चा वेगाने पुढे सरकली असून, आता ती अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट वरुणच्या कारकिर्दीसाठी एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संधी ठरू शकतो, असे मानले जात आहे.
मिळालेल्या वृत्तांनुसार, हा हॉलिवूड प्रकल्प 'समांतर विश्वाच्या' (parallel universes) संकल्पनेवर आधारित असलेला एक भव्य ॲक्शन चित्रपट असेल. विशेष म्हणजे, लॉरेन्स कासानॉफ यांनी १९९० मध्ये जेम्स कॅमेरॉन यांच्यासोबत 'लाईटस्टॉर्म एंटरटेनमेंट' (Lightstorm Entertainment) या निर्मिती संस्थेची सह-स्थापना केली होती. 'टर्मिनेटर २' (Terminator 2) आणि 'मॉर्टल कॉम्बॅट' (Mortal Kombat) यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर