
बदायूं/बरेली, 25 मे (हिं.स.) : गंगा दशहरा निमित्त सोमवारी उत्तर प्रदेशच्या बदायूं आणि बरेली जिल्ह्यांत स्नानादरम्यान भीषण दुर्घटना घडली. विविध घाटांवर खोल पाण्यात गेल्याने एकूण 31 भाविक बुडाल्याची घटना समोर आली. यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला असून 10 वर्षीय एका मुलीचा अद्याप शोध लागलेला नाही. इतर अनेक भाविकांना गोताखोर आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
बदायूंमधील कछला घाटावर प्रशासनाकडून सतत भाविकांना सावध राहण्याचे आणि खोल पाण्यात न जाण्याचे आवाहन करण्यात येत होते. जिल्हाधिकारी अविनाश राय आणि एसएसपी अंकिता शर्मा स्वतः घाटावर उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मात्र, इशारे देऊनही अनेक भाविक खोल पाण्याकडे जात राहिले. सकाळी सुमारे 8 वाजता हाथरस जिल्ह्यातील कानऊ गावचे ओमवीर आपल्या मुलगा नीलेश आणि नातेवाईकांसह कछला घाटावर स्नानासाठी आले होते. मुख्य घाटापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर स्नान करत असताना नीलेश, विकास, चार वर्षीय कृष्णा, शालिनी, 10 वर्षीय शिखा आणि रोहित हे अचानक खोल पाण्यात बुडू लागले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नावाड्यांनी आणि पाणबुड्यांनी तात्काळ गंगेत उडी मारून बचावकार्य सुरू केले. विकास, कृष्णा आणि शालिनी यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, सायंकाळपर्यंत नीलेश आणि रोहित यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर 10 वर्षीय शिखाचा अद्याप शोध लागलेला नसून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.
अन्य दुर्घटनांमध्येही मृत्यू
याचदरम्यान, कछला घाटावर सिरसा दबरई गावचे राजकुमार आणि सूरज हे देखील खोल पाण्यात अडकले. गोताखोरांनी सूरजला वाचवले, मात्र राजकुमार यांचा मृत्यू झाला.अटैना घाटावर मैनपुरी जिल्ह्यातील हुसैनपूर गावचे पिंटू स्नान करताना बुडाले. त्यांच्या भावाने अजय यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर पोलीस आणि गोताखोर घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने पिंटू यांचा मृतदेह सापडला.
दुपारी सुमारे तीन वाजता फर्रुखाबाद जिल्ह्यातील न्यूनैहरा गावचे अनुपम आणि त्यांचे मामा जितेंद्र नदीच्या दुसऱ्या काठाकडे पोहत जात असताना अनुपम भोवऱ्यात अडकले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.
बरेलीच्या गुलाबनगर गावातील बहगुल नदीत स्नान करताना आणखी एक हृदयद्रावक घटना घडली. फरीदपूर येथील 14 वर्षीय आदित्य ठाकूर पाण्यात बुडताना दिसताच बदायूंमधील बिनावर गावचा अभिषेक त्याला वाचवण्यासाठी नदीत उतरला. मात्र दोघेही खोल पाण्यात गेले. सुमारे दीड तासांच्या शोधानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
कछला घाटावर बुडालेल्या इतर अनेक भाविकांना पाणबुडे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित वाचवण्यात आले. प्रशासनाने भाविकांना नदीत स्नान करताना विशेष काळजी घेण्याचे, सुरक्षित मर्यादेत राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी