भारतीय सैन्याच्या 105 मिमी फील्ड गनचे आधुनिकीकरण
‘शूट अँड स्कूट’ क्षमतेत झाली मोठी वाढ नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.) : भारतीय सैन्याने आपल्या 105 मिमी इंडियन फील्ड गनमध्ये स्वयंचलित लक्ष्य साधणारी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली बसवून तोफखान्याच्या क्षमतेत महत्त्वपूर्ण वाढ केली आहे. या आधुनिकीकरणामुळ
आर्मी गनचा प्रतिकात्मक फोटो


‘शूट अँड स्कूट’ क्षमतेत झाली मोठी वाढ

नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.) : भारतीय सैन्याने आपल्या 105 मिमी इंडियन फील्ड गनमध्ये स्वयंचलित लक्ष्य साधणारी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली बसवून तोफखान्याच्या क्षमतेत महत्त्वपूर्ण वाढ केली आहे. या आधुनिकीकरणामुळे तोफांना अधिक अचूक निशाणा साधणे, जलद प्रतिसाद देणे आणि रणांगणावर त्वरीत स्थान बदलणे शक्य होणार आहे.

ही सुधारणा भारतीय सैन्याच्या सुरू असलेल्या व्यापक आधुनिकीकरण मोहिमेचा एक भाग मानली जात आहे.

नव्या प्रणालीमुळे तोफ लक्ष्यावर सेट करण्यासाठी पूर्वी हाताने करावे लागणारे काम आता संगणकाच्या सहाय्याने स्वयंचलित पद्धतीने केले जाणार आहे. तोफखान्यातील या प्रक्रियेला “लेइंग” असे म्हटले जाते.

या आधुनिक प्रणालीमुळे तोफखाना दलाला फायरिंगसाठी आवश्यक गणिते आणि अचूक लक्ष्य निर्धारण अधिक वेगाने करता येणार आहे. परिणामी, फायरिंगची अचूकता आणि गती दोन्हीमध्ये वाढ होईल.

सध्या सैन्याकडे असलेल्या एफएच-77बी बोफोर्स हॉवित्झर, के-9 वज्र आणि एम777 हॉवित्झर या आधुनिक तोफ प्रणालींमध्येही संगणकीय लक्ष्य प्रणालीचा वापर केला जातो. आता 105 मिमी इंडियन फील्ड गनलाही त्याच धर्तीवर आधुनिक बनविण्यात आले आहे.

सैन्य सूत्रांच्या माहितीनुसार, ऑटोमॅटिक गन-लेइंग तंत्रज्ञानामुळे तोफांची मारक क्षमता वाढेल. फायरिंग युनिटचा प्रतिसाद वेळ कमी होईल आणि लक्ष्यभेदन अधिक अचूक होईल. यामुळे फायरिंगचा वेग वाढण्यासही मदत होणार आहे.

डिजिटल फायर-कंट्रोल सिस्टीममधील मोटराइज्ड ड्राइव्हच्या सहाय्याने हाताने फिरवले जाणारे क्रॅंक बदलण्यात आले आहेत. त्यामुळे लक्ष्य ओळखणे आणि तोफ पुन्हा सेट करण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होतो.

विशेषतः डोंगराळ आणि कठीण भौगोलिक भागांमध्ये होणाऱ्या युद्धासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. “शूट अँड स्कूट” क्षमतेमुळे तोफखाना दल वेगाने गोळीबार करून तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलू शकणार आहे, ज्यामुळे सैनिकांच्या सुरक्षिततेतही वाढ होईल.

महत्त्वाची बाब म्हणजे, या तोफेतील सर्व सुधारणा सैन्याच्या 506 आर्मी बेस वर्कशॉपमध्येच करण्यात आल्या आहेत.-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande