जळगाव, 25 मे (हिं.स.) : भारत आणि नॉर्वे यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली गेलेली 'भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषद' नुकतीच नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे संपन्न झाली. हरित ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान, आणि सागरी उद्योग अशा विविध क्षेत्रांतील धोरणात्मक भागीदारीवर या परिषदेत मंथन करण्यात आले. या जागतिक मंचावर जळगावचे सुपुत्र आणि तरुण उद्योजक मोहित बाफना यांनी भारताच्या संरक्षण आणि प्रगत ड्रोन तंत्रज्ञान क्षमतेचे प्रभावी सादरीकरण करून देशाचा गौरव वाढवला.
या हाय-प्रोफाइल परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोरे, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि नॉर्वेचे युवराज हाकोन यांसारख्या दिग्गज जागतिक नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच परिषदेत टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत फोर्ज, अदानी समूह, लार्सन अँड टुब्रो आणि वारी समूह यांसारख्या भारतातील आघाडीच्या औद्योगिक समूहांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वारी समूहाचे हितेश दोशी, सुहाना मसाल्याचे आनंद चोरडिया आणि मेहता इक्विटीजचे रजत मेहता यांसारख्या प्रमुख कॉर्पोरेट नेत्यांचा समावेश होता.
जागतिक मंचावर 'नर्चर एरोस्पेस'चे प्रतिनिधित्व
या सर्व दिग्गजांच्या उपस्थितीत 'नर्चर एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड'चे प्रतिनिधित्व करणारे मोहित बाफना हे परिषदेचे मुख्य आकर्षण ठरले. बाफना यांनी परिषदेदरम्यान झालेल्या उच्चस्तरीय चर्चांमध्ये भारताच्या वेगाने वाढणाऱ्या एरोस्पेस अभियांत्रिकी, स्वदेशी ड्रोन प्रणाली आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अद्ययावत क्षमता जगासमोर मांडल्या.
"आजचा भारत हा जागतिक एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात एक अत्यंत विश्वासार्ह आणि सक्षम भागीदार म्हणून उदयास येत आहे. भारताचे तरुण उद्योजक आणि खासगी क्षेत्र जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहेत," असा विश्वास मोहित बाफना यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
उद्योग तज्ज्ञांच्या मते, बाफना आणि इतर भारतीय तरुण व्यावसायिक नेत्यांचा हा सक्रिय सहभाग भारत-नॉर्वे संबंधांना एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा ठरेल. या परिषदेमुळे भविष्यात संरक्षण आणि शाश्वत औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आणि तांत्रिक देवाणघेवाण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी