

महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना ‘पद्म' पुरस्कार प्रदान
अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण
नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित नागरी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात वर्ष 2026 साठीचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. आजच्या समारंभात धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर), एन राजमयांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रातल्या एकूण 8 व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रख्यात अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर वित्तीय सेवा क्षेत्रातील अग्रणी उद्योजक उदय कोटक, प्रख्यात जाहिरातकार पीयूष पांडे (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, समाजसेवक जनार्दन बोथे, ख्यातनाम तमाशा कलाकार रघुवीर खेडकर, शेतीतज्ज्ञ श्रीरंग लाड, उद्योजक सत्यनारायण नुवाल, प्रख्यात प्राध्यापक जुझेर वासी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समारंभात राष्ट्रपतींनी दोन पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि ५८ पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.
पद्मभूषण पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये गायिका अलका याज्ञिक, अभिनेते अभिनेते मम्मुटी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी आणि माजी टेनिसपटू अमितराज, ए. ई. मुथुनायगम, अनिल कुमार रस्तोगी, अशोक खाडे, अशोक कुमार सिंह, बलदेव सिंह, भगवानदास रायकरवार, बुद्धा रश्मि मणी, दीपिका रेड्डी, गफरुद्दीन मेवाती जोगी, हरमनप्रीत कौर भुल्लर, इंदरजीत सिंह सिद्धू, ज्योतिष देबनाथ, के. विजय कुमार, कुमार बोस, महेंद्र कुमार मिश्रा, मंगला कपूर, मोहन नागर, नारायण व्यास, नरेश चंद्र देव वर्मा, डॉ. पद्मा गुरमेट, प्रभाकर बसवप्रभु कोरे, प्रतीक शर्मा, प्रोसेनजीत चटर्जी, रोहित शर्मा, सविता पुनिया, शशी शेखर वेम्पती, सिवसंकरी, स्वामी ब्रह्मदेव महाराज, तरुण भट्टाचार्य, तृप्ती मुखर्जी आणि इतर अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
दरम्यान, पद्म पुरस्कार २०२६ सोहळ्यात चित्रपट, संगीत, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा केंद्र सरकारने २५ जानेवारी रोजी एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. त्यामध्ये पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता.
यावेळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule