जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग गंडोला केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड; शेकडो पर्यटक अडकले, सर्व प्रवासी सुरक्षित
जम्मू, 25 मे (हिं.स.)। जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथील प्रसिद्ध गंडोला केबल कार सेवेत सोमवारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी खळबळ उडाली. या बिघाडामुळे गंडोला सेवांचे दोन्ही टप्पे तातडीने बंद करण्यात आले आणि हवेत लटकलेल्या अनेक केबिनमध्ये शेकडो
Technical Glitch in Gulmarg Gondola Cable Car in J&K


जम्मू, 25 मे (हिं.स.)। जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथील प्रसिद्ध गंडोला केबल कार सेवेत सोमवारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी खळबळ उडाली. या बिघाडामुळे गंडोला सेवांचे दोन्ही टप्पे तातडीने बंद करण्यात आले आणि हवेत लटकलेल्या अनेक केबिनमध्ये शेकडो पर्यटक अडकून पडले. मात्र, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी तातडीने बचाव मोहीम राबवत सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू केले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंडोला सेवेत अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण सेवा थांबवण्यात आली. त्या वेळी अनेक पर्यटक केबल कारमधून प्रवासाचा आनंद घेत होते. काही केबिन हवेतच अडकून राहिल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस आणि विशेष बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली.

केबल कार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सय्यद कमर सज्जाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही कोणतीही मोठी दुर्घटना नसून केवळ तांत्रिक बिघाड आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे. पुढील तीन ते चार तासांत संपूर्ण व्यवस्था पूर्ववत होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. बचावकार्यासाठी चार विशेष केबल कार बचाव पथके कार्यरत असून पोलीस आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानही मदत करत आहेत. अडकलेल्या ५२ केबिनपैकी सहा केबिनमधील प्रवाशांना सुरक्षित खाली आणण्यात यश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे सांगितले. त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात सर्व केबिन सुरक्षित असल्याचे नमूद केले. जमिनीवर प्रशिक्षित पथके बचावकार्य करत असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande