लातूरमध्ये अपहृत युवकाची सुखरूप सुटका; दोन आरोपी जेरबंद
लातूर, २६ मे (हिं.स.) : औसद शहाजानी परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या युवकाची अवघ्या काही तासांत सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या धाडसी कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. ही घटना २५ मे रोजी सायंकाळी घड
लातूरमध्ये अपहृत युवकाची सुखरूप सुटका; दोन आरोपी जेरबंद


लातूर, २६ मे (हिं.स.) : औसद शहाजानी परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या युवकाची अवघ्या काही तासांत सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या धाडसी कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

ही घटना २५ मे रोजी सायंकाळी घडली. बांगर हे पेट्रोलिंग करत असताना मौजे तगरखेडा येथील पुलाजवळून एका युवकाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच जणांनी एका युवकाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून लातूरच्या दिशेने नेले होते. त्यानंतर पोलिसांनी वाहनाचा क्रमांक मिळवत नियंत्रण कक्षाला कळवले आणि परिसरातील विविध पोलीस ठाण्यांना सतर्क केले. निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि निटूर परिसरात नाकाबंदी करण्यात आली.

दरम्यान, संशयित वाहन निटूर मार्गे लातूरकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार सुधीर शिंदे यांनी खाजगी वाहनातून पाठलाग सुरू केला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पानचिंचोली परिसरात वाहन थांबवून अपहरण केलेल्या युवकाला सोडून दिले आणि उसाच्या शेतात पळ काढला.

काही वेळातच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि युवकाची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोन आरोपींना पकडण्यात आले.

सद्दाम मुस्ताक फारुकी

आणि वाजिद हक्कानी उर्फ हकानी शेख

अशी या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मोईन अकबर चौधरी यांच्या तक्रारीवरून आणखी काही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात अनैतिक संबंधाच्या संशयातून कट रचून हे अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपींनी फिर्यादीला अडवून मारहाण केली, डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या संपूर्ण कारवाईत पोलिसांचे पथक, स्थानिक ग्रामस्थ आणि तपास यंत्रणांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande