
नाशिक, 26 मे (हिं.स.)।
शहरासह इतर ठिकाणी आश्रम व मठ स्थापन करून विविध समस्यांनी ग्रस्त व्यक्तींना स्मशानातील अघोरी पूजाविधी, दैवी तोडगे आणि अंधश्रद्धायुक्त उपायांच्या नावाखाली फसवणूक व शोषण करणाऱ्या संशयित भोंदूबाबा कमलेश महाराज अधिकारी आणि त्याची पत्नी गौरी अधिकारी यांच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात प्रकरणानंतर आता भोंदूबाबांच्या कारवायांचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अंनिसच्या प्रयत्नांतून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील लऊळ येथील मदन नवनाथ देवकर आणि ज्ञानेश्वर नवनाथ देवकर या दोन भावांच्या आई-वडिलांचे २०२१ मध्ये महिनाभराच्या अंतराने निधन झाले होते. या घटनेनंतर दोघेही भीतीच्या छायेत जगत होते. त्यावर उपाय शोधताना त्यांना युट्यूबवर नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील खंडोबानगर येथे राहणाऱ्या कमलेश अधिकारी याची माहिती मिळाली. त्यांनी नाशिकला येऊन त्याची भेट घेतली.
कमलेश अधिकारी याने त्यांच्या कुटुंबावर मागील जन्माचे पाप असून, राहत्या जमिनीत दैवी दोष आणि गुप्तधनावर अतृप्त आत्म्यांचा वावर असल्याचे सांगितले. तसेच आई-वडिलांचा मृत्यू याच कारणामुळे झाला असून, दोघा भावांनाही मृत्यूयोग असल्याची भीती दाखवली. त्यानंतर दैवी उपचारांच्या नावाखाली त्यांच्या मनावर प्रभाव टाकण्यात आला.पुढे या दोघा भावांना उज्जैन येथे बोलावून स्मशानभूमीत जळत्या चितेजवळ चार दिवस अघोरी पूजा करण्यात आली. विविध पशूंचे बळी देण्यात आले आणि दैवी पूजेच्या नावाखाली दीड लाख रुपये उकळण्यात आले. त्यानंतर नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमातही अघोरी पूजा करून पशुबळी देण्यात आल्याचा आरोप आहे. दारूला प्रसाद म्हणून देण्यात आल्याचेही समोर आले आहे.
यानंतर त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात दोघांना बळजबरीने ठेवून त्यांच्याकडून घरगुती कामे करून घेतली गेली. भीती आणि आमिष दाखवून त्यांचे विविध प्रकारे शोषण करण्यात आले. तसेच मठ बांधण्याच्या नावाखाली त्यांची दोन एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचाही आरोप आहे. या सर्व प्रकारात कमलेश अधिकारी याची पत्नी गौरी अधिकारी हिचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.सोलापूर येथील या पीडितांनी नाशिकमधील अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कार्यकर्त्यांनी पीडितांना घेऊन इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासमोर पीडितांनी आपबीती मांडली. त्यानंतर कारंडे यांनी प्रकरण गांभीर्याने घेत कमलेश अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.या प्रकरणात अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, ॲड. बाबासाहेब ननावरे, अनुप खैरनार, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे आणि ॲड. सुशीलकुमार इंदवे यांनी पीडितांना मदत करून पोलिसांपर्यंत पोहोचवले. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करत आहेत.या संदर्भात आणखी कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी अंनिस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अंनिसकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV