राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभाध्यक्षांकडून गोवा राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 30 मे (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देत राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे, नैसर्गिक सौंदर्याचे
Leaders Extend Greetings Goa Statehood Day


नवी दिल्ली, 30 मे (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देत राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे, नैसर्गिक सौंदर्याचे आणि विकास प्रवासाचे कौतुक केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, गोवा केवळ आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी आणि आदरातिथ्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर शिक्षण, तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती करत आहे. नवोपक्रम, पर्यावरण संरक्षण आणि सर्वसमावेशक विकासाबाबतची आपली बांधिलकी जपत गोवा विकसित भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यांनी राज्यातील नागरिकांच्या समृद्धी आणि आनंदासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले की, हा दिवस गोव्याची ओळख आणि प्रगतीसाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांना कृतज्ञतेने स्मरण करण्याची संधी आहे. गोवा सातत्याने प्रगती करत राहो आणि विकसित भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत राहो, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधानांनी गोव्यातील जनतेच्या उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठीही शुभेच्छा दिल्या.

एका अन्य पोस्टमध्ये पंतप्रधानांनी गोव्याच्या मातृभाषेतूनही शुभेच्छा दिल्या. गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत त्यांनी गोव्याची संस्कृती, वारसा आणि जनजीवनाचे कौतुक केले. तसेच राज्याच्या विकास आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोव्याला नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, विविध परंपरा आणि उत्साही जीवनशैलीने परिपूर्ण भारतातील एक महत्त्वाचे राज्य असल्याचे म्हटले. त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना सांगितले की, समुद्रकिनाऱ्यांचे मनोहारी सौंदर्य, ऐतिहासिक वारसा, कला-संस्कृती आणि सामाजिक सौहार्द यांमुळे गोव्याला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी गोव्याला विविध संस्कृती आणि वारशाचा भव्य संगम संबोधत राज्याच्या सातत्यपूर्ण समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, गोव्याच्या उत्साही परंपरा, सामाजिक सलोखा आणि वाढत्या आकांक्षा भारताच्या ‘विविधतेत एकता’ या शक्तीचे दर्शन घडवतात.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे आणि सांस्कृतिक विविधतेचे कौतुक करत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याने सातत्याने प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुनराम मेघवाल यांनी राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देताना पर्यटनासह सर्व क्षेत्रांमध्ये विकास व्हावा आणि नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी कामना केली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गोव्याला संस्कृती, सौहार्द आणि प्रगतीचे प्रतीक म्हटले. त्यांनी नमूद केले की, 1987 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली गोव्याला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यांनी राज्यात शांतता, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गोव्याला भारतातील सर्वात अनमोल भूमींपैकी एक संबोधले. नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध इतिहास आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारशासाठी गोवा ओळखला जातो, असे सांगत त्यांनी राज्याच्या सातत्यपूर्ण प्रगती आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनीही गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोवा आपल्या हृदयाच्या अतिशय जवळ असल्याचे सांगितले. गोव्यातील जनतेची आत्मीयता आणि आपुलकी नेहमीच प्रभावित करत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी गोवावासीयांच्या सुख, समृद्धी आणि आनंदासाठी शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे, 30 मे 1987 रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला. तेव्हापासून पर्यटन, संस्कृती, शिक्षण आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रांत राज्य सातत्याने प्रगती करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande