
अमरावती, 31 मे (हिं.स.)| तिवसा तालुक्यातील सातरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तेरवीच्या कार्यक्रमानंतर तब्बल १८ जणांची प्रकृती अचानक बिघडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. उलट्या, मळमळ व अशक्तपणाची लक्षणे आढळून आल्याने बाधितांना तातडीने तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातरगाव येथील धानोरकर कुटुंबाकडे शनिवारी तेराव्या दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नातेवाईक, गावकरी आणि बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रमानिमित्त भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर कार्यक्रम सुरळीत पार पडल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत भोजनाचा कार्यक्रम सुरू होता. मात्र मध्यरात्रीनंतर काही व्यक्तींना पोटात दुखणे, मळमळ, उलट्याचा त्रास सुरू झाला. यामध्ये धानोरकर परिवारातील दहा जण आणि उर्वरित पाहुणे मंडळी अशी सकाळपर्यंत बाधितांची संख्या वाढल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी तिवसा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, नेमकी विषबाधा कशामुळे झाली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काही नागरिकांच्या मते, सध्या परिसरात तीव्र उन्हाळा असून दुपारचे बनविलेले अन्न रात्री उशिरा सेवन केल्याने ते खराब झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काहींनी पिण्याच्या पाण्याच्या कॅनबद्दल, स्वच्छतेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे दूषित अन्नपदार्थ की अस्वच्छ पाणी, यामुळे हा प्रकार घडला, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक तपासणी करून रुग्णांवर उपचार सुरू केले असून काहींना उपचारानंतर सुखरुप घरी पाठविण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी